रॉबिन वॅन पर्सीच्या दोन शानदार गोलच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडने विगान अ‍ॅथलेटिकवर २-० अशी मात केली आणि कम्युनिटी शिल्ड जिंकण्याची किमया साधली. इंग्लिश प्रीमिअर लीगच्या विजेत्या मँचेस्टर युनायटेडने संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखत एफए चषक विजेत्या विगान अ‍ॅथलेटिकचा धुव्वा उडवला. मँचेस्टर युनायटेडच्या खेळाडूंनी नवीन व्यवस्थापक डेव्हिड मोयस यांना सलामीच्या लढतीतच विजयाची अनोखी भेट दिली.
सहाव्या मिनिटाला वॅन पर्सीने हेडरच्या साह्य़ाने गोल करत मँचेस्टर युनायटेडचे खाते उघडले. पॅट्रिस इव्हराच्या क्रॉसचा सुरेख उपयोग करत वॅन पर्सीने शानदार गोल केला. मँचेस्टरच्या ताफ्यातील नवीन खेळाडू विल्फ्रेड झाहाने चेंडूवर सातत्याने नियंत्रण राखत गोलसाठी जोरदार प्रयत्न केले. मँचेस्टरचे आक्रमण थोपवण्यासाठी विगाानने बचाव मजबूत केला. यामुळे मध्यंतरापर्यंत मँचेस्टर युनायटेडला एका गुणावरच समाधान मानावे लागले होते. मात्र बचावावर भर दिल्याने गोल करण्यात विगानच्या आघाडीपटूंना अपयश आले. मध्यंतरानंतर थोडय़ाच वेळात वॅन पर्सीने आणखी एक गोल करत मँचेस्टर युनायटेडला भक्कम आघाडी मिळवून दिली.  ‘‘संघाच्या विजयात योगदान देणे सुखावणारे आहे. नवीन हंगामासाठी मी सज्ज आहे. संघाची एकत्रित कामगिरी चांगली झाली. यंदाही आम्ही जेतेपद कमावू असा विश्वास आहे,’’ असे व्ॉन पर्सीने सांगितले.