‘२००९ मध्ये मी आणि डेल स्टेन आयपीएलमधल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग होतो. त्या संघात रोलॅफ व्हॅन डर मर्व्ह होता. २०२३ वर्ष सुरू आहे. वर्ल्डकपसाठीच्या कार्यक्रमात एक्सपर्ट पॅनेलमध्ये मी आणि डेल स्टेन बसलो आहोत. रोलॅफ व्हॅन डर मर्व्ह अजूनही खेळतोच आहे’- वसीम जाफर
रोलॅफ व्हॅन डर मर्व्ह या क्रिकेटररुपी वल्लीचं जाफर यांनी केलेलं वर्णन पुरेसं बोलकं ठरावं. नेदरलँड्सचा संघ प्रदीर्घ काळानंतर वर्ल्डकप स्पर्धेत खेळतोय. या संघाचा एक आधारस्तंभ म्हणजे रोलॅफ व्हॅन डर मर्व्ह. डावखुरा फिरकी गोलंदाज, उपयुक्त खेळी करणारा फलंदाज, उत्तम क्षेत्ररक्षक आणि संघासाठी जीव तोडून योगदान देणारा शिलेदार ही व्हॅन डर मर्व्हची ओळख आहे. ३८वर्षीय व्हॅन डर मर्व्ह हा यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेतल्या वयस्कर खेळाडूंपैकी एक आहे. पण त्याचा खेळ पाहताना सेकंदभरही त्याचं वय जाणवत नाही. हवेत उडालेला चेंडू टिपण्यासाठी तो अख्खं मैदानभर पळू शकतो. हातातल्या चेंडूसह अचूक थ्रो करुन स्टंप्सचा वेध घेतो. विकेट पटकावल्यानंतर रोलॅफचं सेलिब्रेशनही पाहण्यासारखं असतं. रोलॅफ संघात असणं हा कर्णधारासाठी आशेचा, उत्साहाचा आणि विश्वासाचा किरण आहे.
रोलॅफ आता नेदरलँड्सकडून खेळत असला तरी तो मूळचा दक्षिण आफ्रिकेचा आहे. जोहान्सबर्गमध्ये जन्म झालेला रोलॅफ फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये नॉदर्न्स आणि नंतर टायटन्स संघाकडून खेळायचा. डावखुरे फिरकीपटू ही दुर्मीळ श्रेणी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात एकापेक्षा एक सरस वेगवान गोलंदाज असतात. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्याही वेगवान गोलंदाजीला पोषक अशाच असतात. त्यामुळे अंतिम अकरात एखादाच फिरकीपटू असतो किंवा काही वेळेस फक्त वेगवान गोलंदाजच आक्रमणाची धुरा सांभाळतात. फिरकीची षटकं कामचलाऊ गोलंदाज टाकतो. यामुळे रोलॅफला दक्षिण आफ्रिकेसाठी किती खेळायला मिळेल याविषयी साशंकता होती. २००९ मध्ये रोलॅफने दक्षिण आफ्रिकेसाठी वनडे आणि ट्वेन्टी२० पदार्पण केलं. दोन वर्ष तो दक्षिण आफ्रिकेसाठी खेळला. २०११ मध्ये आशियाई उपखंडात झालेल्या वर्ल्डकपसाठी संघात निवड होईल असं रोलॅफला वाटलं होतं पण तसं झालं नाही. ट्वेन्टी२० वर्ल्डकपसाठीच्या दक्षिण आफ्रिका संघाचा तो भाग होता.
२००९-१० ही दोन वर्ष रोलॅफ आयपीएलमधल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी खेळला. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा तो सहकारी होता. राहुल द्रविड, वासिम जाफर, मार्क, बाऊचर, रॉस टेलर, जॅक कॅलिस, अनिल कुंबळे, डेल स्टेन त्या संघात होते. बंगळुरू संघाकडून तो खेळला पण संघात अनेक मोठे खेळाडू असल्याने संधी मर्यादित राहिल्या. दोन वर्षांनंतर बंगळुरूने त्याला रिलीज केलं. २०११ ते २०१३ रोलॅफ दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळला. आयपीएलच्या निमित्ताने तो नियमित भारतात यायचा. हा अनुभव त्याला आता कामी येतो आहे. २०१३ नंतर मात्र आयपीएल संघांनी त्याला ताफ्यात दाखल करण्यात स्वारस्य दाखवलं नाही.
आणखी वाचा: Ned vs New: नेदरलँड्स संघातली ‘भारतीय’ कुमक- विक्रमजीत, तेजा आणि आर्यन
रोलॅफची आई नेदरलँड्सची आहे. आईवडिलांपैकी एकजण अन्य देशाचा असेल तर मुलाला त्या देशाचा पासपोर्ट मिळू शकतो. या नियमामुळे रोलॅफचा नेदरलँड्स प्रवेश झाला. नेदरलँड्स आयसीसीच्या श्रेणीत असोसिएट संघ आहे. आपापली नोकरी-व्यवसाय सांभाळून अनेकजण नेदरलँड्सच्या राष्ट्रीय संघासाठी खेळतात. आशियाई उपखंडातून कामानिमित्त नेदरलँड्सला स्थायिक झालेले खेळाडूही या संघात दिसतात. रोलॅफसारखा आंतरराष्ट्रीय अनुभव असलेला खेळाडू संघात असणं नेदरलँड्ससाठी फायदेशीर होतं. रोलॅफ नेदरलँड्सचा संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज झाला. नेदरलँड्ससाठी खेळत असतानाच रोलॅफ जगभरात विविध ट्वेन्टी२० लीगमध्येही खेळतो. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेतील ब्रिस्बेन हिट, कॅरेबियन प्रीमिअर लीगमधल्या सेंट ल्युसिआ झोकस तसंच बार्बाडोस रॉयल्स, इंग्लंडमधल्या हंड्रेड स्पर्धेतील वेल्श फायर, दक्षिण आफ्रिकेतील सनरायझर्स इस्टर्न केप अशा अनेक संघांसाठी खेळतो.
वर्ल्डकप खेळण्याचं रोलॅफचं स्वप्न यंदा पूर्ण होत आहे. डावखुरे फिरकीपटू निर्णायक ठरत असल्याचा त्याला आनंद आहे. रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मिचेल सँटनर, शकीब उल हसन हे सगळेच आपापल्या संघासाठी उत्तम कामगिरी करत आहेत.
आज रोलॅफ आपल्या मूळ देशाविरुद्ध म्हणजेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. गेल्यावर्षी ट्वेन्टी२० वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला नमवण्याची किमया केली होती. नेदरलँड्सला त्या कामगिरीची पुनरावृत्ती करायची असेल तर रोलॅफला दमदार प्रदर्शन करणं भाग आहे.