टेनिसपटू रॉजर फेडररनं फ्रेंच ओपनमधून माघार घेतली आहे. अंतिम १६ मध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी माघार घेतल्याचं जाहीर केलं आहे. फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत त्याने डॉमनिक कॉएफरचा ७-६, ६-७, ७-६, ७-५ ने पराभव केला होता. मात्र यासाठी त्याला कडवी झुंज द्यावी लागली. हा सामना जवळपास ३ तास ३५ मिनिटं चालला. फेडररला गेल्या वर्षभरापासून गुडघ्याच्या दुखापतीचा त्रास होत आहे. यासाठी गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यामुळे जास्त त्रास होऊ नये यासाठी त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. रॉजर फेडररने सोशल मीडियावर माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. फेडररचा पुढचा सामना इटलीच्या माटोओसोबत होणार होता. फेडररने माघार घेतल्याने राफेल नदालकडे २१ वा ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी आहे. फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच एकाच ग्रुपमध्ये आहेत.

“दोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर खेळणं कठीण आहे. संघासोबत चर्चा केल्यानंतर मी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका वर्षात दोन शस्त्रक्रिया झाल्याने मी शरीराला आराम देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी टेनिस कोर्टवर परतणं तेवढं चांगलं ठरलं नाही. मात्र लवकरच भेटू”, असं रॉजर फेडररने ट्वीट केलं आहे.

फ्रेंच ओपनमध्ये तिसरी फेरी खेळल्यानंतर त्याने याबाबत पुसटशी कल्पना दिली होती. आता गुडघ्यांना जास्त त्रास द्यायचा की नाही याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे, असं त्याने सांगितलं होतं. तसेच फ्रेंच ओपन २०२१ पेक्षा विम्बलडनला प्राधान्य असल्याचं देखील त्याने सांगितलं होतं. २८ जूनपासून विम्बलडन स्पर्धा सुरु होत आहे.

नाओमी ओसाकाचीही स्पर्धेतून माघार

फ्रेंच ओपनमध्ये झालेल्या वादानंतर टेनिसपटू नाओमी ओसाकानेही माघार घेतली आहे. तिला सामानाधिकाऱ्यांनी १५ हजार डॉलर्सचा दंड ठोठावला होता. त्यानंतर नाओमीने स्पर्धेतून माघार घेतली.