आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल २० ग्रँड स्लॅम खिताब नावावर करणारा टेनिसचा बादशाह रॉजर फेडररनं निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्र पोस्ट करून त्यातून त्यानं आपल्या चाहत्यांना निवृत्तीची बातमी दिली आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या लेवर कप स्पर्धेनंतर आपण निवृत्त होत असल्याचं रॉडर फेडररनं या पत्रामध्ये नमूद केलं आहे. त्याच्या या निर्णयामुळे जगभरातील त्याच्या चाहत्यांना धक्का बसला असून त्याच्या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. या पत्रामधून ४१ वर्षीय रॉजर फेडररनं आपल्या मुक्तपणे आपल्या भावना व्यक्त केल्या असून कारकिर्दीत आपल्या पाठिशी उभ्या राहिलेल्या सर्व व्यक्तींना धन्यवाद दिले आहेत.
“मी आता ४१ वर्षांचा आहे. गेल्या २४ वर्षांत मी जवळपास १५०० हून अधिक सामने खेळलो आहे. पण माझ्या या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये कुठे थांबायचं, हे मला ठरवायला हवं”, असं वर्ल्ड टेनिसमध्ये दीर्घकाळ अव्वल क्रमांकावर राहिलेला रॉजर या पत्रात म्हणाला आहे.
यासोबतच रॉजरनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवर त्याच्या चाहत्यांसाठी एक ऑडिओ संदेश देखील दिला आहे.
या पत्रामध्ये रॉजरनं त्याची पत्नी मिर्कालाही धन्यवाद दिले आहेत. “तिने माझ्या पहिल्या अंतिम सामन्याच्या आधी मला खूप प्रोत्साहन दिलं होतं. त्यावेळी ती ८ महिन्यांची गर्भवती होती. पण तिने तेव्हा स्पर्धेतल्या खूप साऱ्या मॅचेस पाहिल्या होत्या. २० वर्षांहून जास्त काळ ती माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आहे”, असं त्यानं या पत्रात नमूद केलं आहे.
टेनिसनं मला आजपर्यंतच्या कारकिर्दीत दिलेल्या अनेक गोष्टींपैकी सर्वात मोलाची भेट म्हणजे या प्रवासात मी भेटलेल्या विलक्षण व्यक्ती! माझे मित्र, माझे प्रतिस्पर्धी खेळाडू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला आयुष्यभर पाठिंबा देणारे माझे चाहते”, असंही या पत्रात रॉजरनं नमूद केलंय. “पुढील आठवड्यात होणारी लेवर कप स्पर्धा ही माझ्या कारकिर्दीतील शेवटची एटीपी स्पर्धा असेल. अर्थात, यानंतरही मी टेनिस खेळत राहीन, पण ग्रँडस्लॅममध्ये नाही”, असंही रॉजरनं या पत्रात स्पष्ट केलं आहे.
आजपर्यंत सर्वात जास्त पुरुष एकेरी ग्रँड स्लॅम विजेते…
राफेल नदाल (स्पेन) – २२ ग्रँड स्लॅम (ऑस्ट्रेलियन २, फ्रेंच १४, विम्बल्डन २, यूएस ४)
नोवाक चोकोविच (सर्बिया) – २१ ग्रँड स्लॅम (ऑस्ट्रेलियन ९, फ्रेंच २, विम्बल्डन ७, यूएस ३)
रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड) – २० ग्रँड स्लॅम (ऑस्ट्रेलियन ६, फ्रेंच १, विम्बल्डन ८, यूएस ५)
पीट सॅम्प्रस (अमेरिका) – १४ ग्रँड स्लॅम (ऑस्ट्रेलियन २, फ्रेंच ०, विम्बल्डन ७, यूएस ५)