फेडररची आग्रही भूमिको
घोटीव व्यावसायिकतेसाठी रॉजर फेडरर ओळखला जातो. वर्षांनुवर्षे ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धामध्ये किमान उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या फेडररची यंदाच्या अमेरिकन खुल्या स्पर्धेत वेगळीच सुप्त इच्छा आहे. चाहत्यांचा प्रेमळ गोंगाट ऐकायला लागला तरी चालेल, पण कोर्ट आच्छादित असावे आणि यासाठीच फेडरर आग्रही आहे. ‘‘कोर्ट्स आच्छादित असेल तर खेळाचा दर्जा सुधारेल. वाऱ्याचा वेग आणि दिशा नियंत्रित असल्याने मोठय़ा खेळाडूंना त्यांचे डावपेच त्यानुसार आखता येतील. वाऱ्याचा प्रभाव कमी झाल्यावर खेळाडूंना बेसलाइनजवळून खेळता येईल. अन्य ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धामध्ये कोर्ट्स आच्छादित असण्याची आम्हाला सवय होईल. ऑर्थर अ‍ॅशे स्टेडियमध्येही अशी सुविधा टेनिसपटूंना उपयुक्त ठरेल,’’ असे फेडररने सांगितले. कोर्ट्स आच्छादित झाल्यानंतर खेळाडूंना आवाजी पाठिंबा देणाऱ्या न्यूयॉर्कमधील चाहत्यांचा त्रास होणार नाही का, असे विचारले असता फेडरर म्हणाला, ‘‘मी त्यासाठी तयार आहे. चाहत्यांचा आवाज एवढा त्रासदायक होईल असे वाटत नाही. अमेरिकेतील व्यवस्थेत खेळ सुरू असताना चाहते आपापसात बोलतात. चाहत्यांना खेळाडूंना जवळून न्याहाळता यावे आणि खेळाची सर्वोत्तम  अनुभूती मिळावी, हे मी समजू शकतो. पण त्यांच्या बोलण्याचा खेळावर विपरीत परिणाम व्हायला नको.’’

Story img Loader