तो स्पर्धेत सहभागी होताच, जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून त्याच्या नावाची चर्चा होते. दोन वर्षांपासून ग्रँडस्लॅम जेतेपदांपासून तो दुरावला आहे. वाढत्या वयानुसार त्याच्या हालचाली मंदावल्या आहेत, दुखापतींना त्याला ग्रासले आहे, तर फॉर्म घसरणीला लागला आहे. मात्र तरीही यंदाच्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदासाठी तो शर्यतीत होता. दुसरे मानांकन मिळाल्यावर विक्रमी १८वे ग्रँडस्लॅम k02पटकावण्यासाठी आणि या स्पर्धेचे पाचवे जेतेपद नावावर करण्यासाठी प्रयत्नशील होता. मात्र कारकीर्दीत कधी थांबावे या पेचात सापडलेल्या रॉजर फेडररला तिसऱ्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. जागतिक क्रमवारीत ४४ स्थानी असलेल्या इटलीच्या आंद्रेस सेप्पीने संघर्षमय विजय मिळवत इतिहास घडवला. अन्य लढतींमध्ये जेतेपदाचे दावेदार असणाऱ्या राफेल नदाल, अँडी मरे, मारिया शारापोव्हा यांनी विजयी आगेकूच करत चौथी फेरी गाठली.
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत १४ वर्षांतील फेडररचा हा सगळ्यात मानहानीकारक पराभव आहे. गेल्यावर्षी विम्बल्डन स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतल पराभव सोडून, ग्रँडस्लॅम स्पर्धेतील फेडररची गेल्या दहा वर्षांतील सगळ्यात वाईट कामगिरी आहे. सेप्पीविरुद्धच्या याआधीच्या दहा लढतींमध्ये फेडररने निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मात्र शुक्रवारी मेलबर्नच्या तळपत्या उन्हाच्या साक्षीने सेप्पीने ६-४, ७-६ (७-५), ४-६, ७-६ (७-५) असा थरारक विजय मिळवला. दिशाहीन सव्‍‌र्हिस, स्वैर फटके, वारंवार होणाऱ्या चुका आणि हाताच्या बोटाला झालेली दुखापत हे फेडररच्या पराभवाची कारणे ठरली तर दुसरीकडे अचूक बिनतोड सव्‍‌र्हिस, सर्वच फटक्यांतली अचूकता आणि सर्वागीण वावरासह चिवट खेळ हे सेप्पीच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले.
पहिले दोन सेट जिंकत सेप्पीने ऐतिहासिक विजयाची पायाभरणी केली. मात्र तिसऱ्या सेटमध्ये फेडररने लौकिकाला साजेसा खेळ करत सेप्पीला निष्प्रभ केले. चौथ्या सेटमध्येही फेडररने पराभव टाळण्याचा प्रयत्न केला मात्र सेप्पीच्या झुंजार खेळापुढे तो अपुरा ठरला.
राफेल नदालने इस्त्रायलच्या डय़ुडी सेलाचा ६-१, ६-०, ७-५ असा धुव्वा उडवत चौथ्या फेरीत स्थान पटकावले. दुसऱ्या फेरीच्या लढतीत विजयासाठी पाचव्या सेटपर्यंत झगडावे लागले होते. मात्र सेलाविरुद्ध आक्रमक खेळ करत नदालने सहज विजय साकारला. अँडी मरेने पोर्तुगालच्या जोआ सौसाचा ६-१, ६-१, ७-५ असा पराभव केला. बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हने मार्कोस बघदातीसवर ४-६, ६-३, ३-६, ६-३, ६-३ असा विजय मिळवला.
महिलांमध्ये मारिया शारापोव्हाने कझाकिस्तानच्या झरिना डियासला ६-१, ६-१ असे नमवले. इग्युेन बोऊचार्डने कॅरोलिन गार्सिआवर ७-५, ६-० असा विजय मिळवला. सिमोन हालेपने अमेरिकेच्या बेथानी मॅटेक सँड्सला ६-४, ७-५ असे नमवले.

सानिया, रोहन, लिएण्डर पराभूत
सानिया मिर्झा, रोहन बोपण्णा यांच्यासह अनुभवी लिएण्डर पेस यांना ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत साथीदारांसह खेळताना दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. गॅब्रिएला डाबरोव्हस्की- अलिसजा रोसोलका जोडीने सानिया मिर्झा- स्यु वेई हेइश जोडीवर ७-६, ६-४ असा विजय मिळवला. मात्र त्यानंतर झालेल्या मिश्र दुहेरीच्या लढतीत सानियाने ब्राझीलच्या ब्रुनो सोरेसच्या साथीने खेळताना टिमिआ बाबोस आणि इरिक ब्युटोरॅक जोडीवर ६-१, ६-४ (१०-३) अशी मात केली.
फेलिसिआनो लोपेझ आणि मॅक्स मिर्नी जोडीने रोहन बोपण्णा आणि डॅनियल नेस्टर जोडीला ७-५, ६-३ असे नमवले. सिमोन बोलेल्ली आणि फॅबिओ फॉगनिनी जोडीने लिएण्डर पेस आणि रावेन लासेन जोडीचा ६-२, ४-६, ६-१ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत महेश भूपती ऑस्ट्रेलियाच्या जर्मिला गजडोसोव्हासह तर बोपण्णा चेक प्रजासत्ताकच्या बी. झाहलोव्हाच्या बरोबरीने आणि पेस मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळणार आहे.

Story img Loader