रॉजर फेडरर आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. सचिन तेंडुलकर अनेकदा विम्बल्डन सामना पाहायला गेल्याचेही दिसून आले आहे. सचिनकडून अनेकदा टेनिसप्रेम उघडपणे व्यक्त करण्यात आले आहे. मात्र यावेळी यापेक्षा काहीसे उलट चित्र दिसले आहे. खुद्द आयसीसीनेच स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याला कसोटी क्रिकेटमधील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असल्याची पावती दिली आहे.
विम्बल्डन स्पर्धेत रॉजर फेडरर आणि फ्रेंच टेनिसपटू अड्रियन मनारीनो या दोघांच्यात अंतिम १६च्या फेरीतील सामना रंगला होता. हा सामना फेडररने ६-०, ७-५, ६-४ असा सरळ सेटमध्ये जिंकला. या सामन्यादरम्यान मनारीनो याने सर्व्हिस केलेला चेंडू फेडररने रोखला. पण तो चेंडू रोखताना त्याने टेनिसमधील शॉट न खेळता क्रिकेटसारखा उभ्या बॅटने चेंडू रोखला.
Ratings for @rogerfederer‘s forward defence, @ICC?#Wimbledon pic.twitter.com/VVAt2wHPa4
— Wimbledon (@Wimbledon) July 9, 2018
सामन्यात याबाबत फारशी चर्चा झाली नाही. पण नंतर हा व्हिडीओ विम्बल्डनकडून ट्विट करण्यात आला. त्या ट्विटमध्ये फेडररच्या या क्रिकेट शॉटसाठी त्याला फलंदाजीत कितवा क्रमांक मिळेल, असा सवाल विम्बल्डनच्या ट्विटर हॅण्डलवरून आयसीसीला करण्यात आला.
विशेष म्हणजे आयसीसीने या ट्विटची दखल घेतली. आणि फेडररने बचावात्मक शॉट खेळून दाखवल्यामुळे त्याला कसोटी क्रिकेट फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान देण्यात आल्याचे ट्विट केले. आयसीसीने केवळ शब्दात ट्विट न करता अधिकृत वेबसाईटचा स्क्रिनशॉट पोस्ट करत त्यात फेडररला पहिला क्रमांक देण्यात आल्याचे दाखवले.
*sigh* ok… pic.twitter.com/KXnhaznxL8
— ICC (@ICC) July 9, 2018
आयसीसीच्या या उत्तराला क्रीडाप्रेमींकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.