स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररने आपल्या अचाट कामगिरीने पुन्हा एकदा निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. ३४ वर्षीय फेडररने तरुणांनाही लाजवील, असा अप्रतिम खेळ करताना नोव्हाक जोकोव्हिचवर ७-६(७/१), ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवत सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पध्रेचे जेतेपद पटकावले. फेडररने सिनसिनाटी मास्टर्स स्पध्रेचे हे सातवे जेतेपद आहे. महिला गटात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने जेतेपद पटकावले. सेरेनाने तिसऱ्या मानांकि सिमॉन हॅलेपचा ६-३, ७-६ (७/५) असा पराभव करून दुसऱ्यांदा स्पध्रेत बाजी मारली.
हे जेतेपद पटकावून काही दिवसांवर आलेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी आपण सज्ज असल्याचा सुचक सल्ला फेडररने प्रतिस्पर्धी खेळाडूंना दिला आहे.   विम्बल्डन खुल्या टेनिस स्पध्रेच्या अंतिम स्पध्रेत जोकोव्हिचकडून पराभव पत्करल्यानंतर फेडररची ही पहिलीच स्पर्धा होती. ‘‘ प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर हा अनपेक्षित विजय आहे. मला विजयाची संधी आहे, हे माहीत होते, परंतु या स्पध्रेपूर्वी इतर खेळाडू मॉन्ट्रिअल मास्टर्स स्पध्रेत खेळल्यामुळे ते बाजी मारतील, असे वाटत होते,’’ अशी प्रतिक्रिया फेडररने दिली. फेडररने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सर्बियाच्या जोकोव्हिचवर ९० मिनिटांत विजय मिळवला. या विजयामुळे फेडररने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली असून जोकोव्हिच अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचे हे कारकीर्दीतील ८७वे आणि मास्टर्स १००० स्पध्रेतील २४वे जेतेपद आहे.

Story img Loader