वृत्तसंस्था, लंडन : दिग्गज टेनिसपटू आणि टेनिसरसिकांच्या ‘लाडक्या’ रॉजर फेडररने शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या लेव्हर चषकातील सामन्यानंतर टेनिसला भावपूर्ण निरोप दिला. हा दिवस, हा सामना फेडररच्या आयुष्यात येऊच नये अशी अनेकांची मनोमन इच्छा होती, पण प्रत्येकच खेळाडूच्या कारकीर्दीत तो दिवस येतोच. २० ग्रँडस्लॅम विजेत्या फेडररसाठी हा अखेरचा सामना खूप मोठा होता. टेनिसविश्वातील त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि तितकाच चांगला मित्र राफेल नदालच्या साथीने तो लेव्हर चषक स्पर्धेत दुहेरीतील अखेरची लढत खेळला. युरोप संघाकडून खेळणाऱ्या फेडरर-नदाल जोडीला जागतिक संघातील फ्रान्सिस टियाफो आणि जॅक सॉक जोडीकडून ६-४, ६-७ (२-७), ९-११ असा पराभव पत्करावा लागला.  आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या फेडररचा टेनिस कोर्टवरील प्रत्येक क्षण चाहते डोळय़ात साठवून ठेवत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामना संपल्यावर फेडररने प्रथम नदाल आणि नंतर प्रतिस्पर्धी जोडीला आिलगन दिले, तेव्हा त्याच्या डोळय़ाच्या कडा पाणावल्या होत्या. लंडनमधील स्थानिक वेळेनुसार सामना रात्री १२.३० वाजता संपला तरी, स्टेडियममधील प्रेक्षक जागेवरून हलले नव्हते. फेडररच्या कारकीर्दीचा आढावा घेतला जात असताना कोर्टवर बाजूला एकत्र बसलेल्या फेडरर आणि नदाल या दोघांनाही अश्रू अनावर झाले. अखेरच्या सामन्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे फेडररने लढतीपूर्वी ‘ट्विटर’च्या माध्यमातून आभार मानले होते. त्याला अखेरच्या लढतीत यश मिळाले नसले तरी, २० ग्रॅंडस्लॅम विजेतीपदे, एकूण १०३ विजेतीपदे, सलग ३१० आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान, डेव्हिस चषक विजेतेपद, ऑलिम्पिक पदक अशा देदीप्यमान कारकीर्दीनंतर फेडररने टेनिसला अलविदा केले. 

निवृत्तीचा निर्णय जेव्हा घेतला, तेव्हा तो पूर्णपणे वैयक्तिक होता. सुरुवातीला मला या निर्णयाचे दु:ख वाटले. मात्र, जेव्हा अंतिम विचार केला तेव्हा हा सर्वोत्तम निर्णय असल्याची खात्री पटली.  

– रॉजर फेडरर

रॉजर फेडररने टेनिसला अलविदा केल्याने मला माझ्या आयुष्यातील एक भागदेखील निघून गेल्यासारखे वाटत आहे. त्याच्यासह आणि त्याच्याविरुद्ध खेळताना, जे काही क्षण माझ्या आयुष्यात आले, ते सगळे महत्त्वाचे आहेत. 

– राफेल नदाल