मानांकित खेळाडूंच्या अनुपस्थितीत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला गटात पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या खेळाडूंमध्ये मुकाबला रंगणार आहे. अंतिम फेरीत स्थान पटकावण्यासाठी कॅरोलिन वोझ्नियाकी आणि पेंग शुआई यांच्यात लढत होणार आहे. पुरुषांमध्ये उपांत्यपूर्व फेरीत गेइल मॉनफिल्ससमोर बलाढय़ रॉजर फेडररचे आव्हान आहे.
एकही ग्रँडस्लॅम जेतेपदाविना वोझ्नियाकीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती. ग्रँडस्लॅम जेतेपदासह कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी असलेल्या वोझ्नियाकीने १३ व्या मानांकित सारा इराणीचा ६-०, ६-१ असा धुव्वा उडवला. २०११ नंतर पहिल्यांदाच वोझ्नियाकीने ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे.
अन्य लढतीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळणाऱ्या चीनच्या पेंग शुआईने स्वित्र्झलडच्या युवा बेलिंडा बेनकिकवर ६-२, ६-१ अशी मात केली. लि ना आणि झेंग जि यांच्यानंतर ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये धडक मारणारी पेंग तिसरी खेळाडू ठरली आहे. तब्बल ३७ व्या प्रयत्नांनंतर पेंगने हे यश मिळवले आहे. जागतिक क्रमवारीत ३९ व्या स्थानी असणाऱ्या पेंगने तीन मानांकित खेळाडूंना नमवत स्पर्धेत वाटचाल केली आहे. सेरेना विल्यम्स आणि कॅरोलिन वोझ्नियाकी यांच्याप्रमाणे पेंगने स्पर्धेत अद्याप एकही सेट गमावलेला नाही. सेरेना विल्यम्ससमोर फ्लॅव्हिना पेनेट्टा हिचे आव्हान असणार आहे. व्हिक्टोरिया अझारेन्का आणि इकाटेरिना माकारोव्हा यांच्यात लढत होणार आहे.
पुरुषांमध्ये रॉजर फेडररने रॉबटरे बॉटिस्टा ऑगटचा ६-४, ६-३, ६-२ सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत स्थान पटकावले. द्वितीय मानांकित फेडररची या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याची ही दहावी वेळ असणार आहे. पुढच्या फेरीत त्याचा मुकाबला गेइल मॉनफिल्सशी होणार आहे. मॉनफिल्सने ग्रिगोर दिमित्रोव्हचे आव्हान ७-५, ७-६ (८-६), ७-५ असे संपुष्टात आणले. सातत्याचा अभाव असणाऱ्या मॉनफिल्सने चिवटपणे खेळ करीत सामना जिंकला. क्रोएशियाच्या मारिन चिलीचने संघर्षमय लढतीत गाइल्स सिमोनवर ५-७, ७-६ (३), ६-४, ३-६, ६-३ असा विजय मिळवला. टॉमस बर्डीचने डॉमिनिक थिइमला ६-१, ६-२, ६-४ असे नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
सानिया-कॅरा उपांत्य फेरीत
सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची साथीदार कॅरा ब्लॅक या जोडीने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत उपांत्य फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित सानिया-कॅरा जोडीने कझाकिस्तानच्या झरिना दियास आणि चीनच्या यि फान झू जोडीवर ६-१, १-० अशी मात केली. पुढच्या फेरीत या जोडीचा मुकाबला मार्टिना हिंगीस आणि क्वेटा पेश्के जोडीशी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा