माजी विजेत्या रॉजर फेडररचे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील विजेतेपदाचे स्वप्न रविवारी धुळीस मिळाले. लॅटवियाच्या एर्नेस्ट गुल्बिसने पाच सेटपर्यंत रंगलेल्या थरारक लढतीनंतर त्याला हरविले. नोव्हाक जोकोव्हिच, टॉमस बर्डीच व अँडी मरे यांनी पुरुषांच्या गटात आपापले सामने जिंकताना स्पर्धेतील आव्हान कायम राखले. दुहेरीत भारताच्या सानिया मिर्झाने अपराजित्व कायम राखले.
गुल्बिस या अपरिचित खेळाडूसाठी रविवारचा दिवस संस्मरणीय ठरला. त्याने माजी जगज्जेता खेळाडू फेडररला गारद करत स्पर्धेच्या चौथ्या फेरीत स्थान मिळविले. शेवटच्या सेटपर्यंत रोमहर्षक ठरलेली लढत त्याने ६-७, ७-६, ६-२, ४-६, ६-४ अशी जिंकली. विक्रमी विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या फेडररला चिवट लढतीनंतर पराभूत व्हावे लागले. सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविण्यासाठी त्याला विम्बल्डन स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
सर्बियाच्या दुसऱ्या मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगा याचे आव्हान ६-१, ६-४, ६-१ असे सहज परतवून लावले. महिलांमध्ये मारिया शारापोव्हाला मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तिला समंथा स्टोसूरने ६-३, ६-३ असे पराभूत केले.
पाच सेट्सपर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत मरेने जर्मन खेळाडू फिलीप कोहेलश्रेबर याच्यावर ३-६, ६-३, ६-३, ४-६, १२-१० असा रोमहर्षक विजय नोंदविला. त्या तुलनेत बर्डीच याला अमेरिकेच्या जॉन इस्नेर याच्याविरुद्ध ६-४, ६-४, ६-४ असा सरळ तीन सेट्समध्ये विजय मिळविताना फारशी अडचण आली नाही. फर्नान्डो वेर्दास्को याने रिचर्ड गास्केट या १२व्या मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का दिला. त्याने हा सामना ६-३, ६-२, ६-३ असा लीलया जिंकला.
इंग्लंडच्या मरेला फिलीप याने कौतुकास्पद लढत दिली. पहिला सेट त्याने घेतला, तथापि दुसऱ्या सेटमध्ये त्याला स्वत:च्या सव्र्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही. मरे याने दुसरा व तिसरा सेट घेत आपली बाजू बळकट केली, मात्र चौथ्या सेटमध्ये फिलीप याने मरे याची सव्र्हिस तोडण्यात यश मिळविले. दोन सेट्सच्या बरोबरीनंतर पाचवा सेट कमालीचा रंगतदार झाला. दोन्ही खेळाडूंनी अव्वल दर्जाच्या टेनिसचा प्रत्यय घडविला. अखेर अनुभवाच्या जोरावर मरे याने सव्र्हिसब्रेक मिळविला. हा सेट घेत त्याने विजय मिळवला.
महिलांमध्ये एवगेनी बुचार्ड (कॅनडा) हिने आठव्या मानांकित अॅना क्रेबर हिचा ६-१, ६-२ असा दणदणीत पराभव केला. सोरेझ नव्हारो हिने अँजेला तोयलाजानोवा या क्रोएशियाच्या खेळाडूवर ६-३, ६-३ अशी मात केली.
फेडररचे साम्राज्य खालसा!
माजी विजेत्या रॉजर फेडररचे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील विजेतेपदाचे स्वप्न रविवारी धुळीस मिळाले. लॅटवियाच्या एर्नेस्ट गुल्बिसने पाच सेटपर्यंत रंगलेल्या थरारक लढतीनंतर त्याला हरविले.
First published on: 02-06-2014 at 01:51 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roger federer knocked out of french open by ernests gulbis