नोव्हाक जोकोव्हिच, अँडी मरे आणि राफेल नदाल यांच्या झंझावातानंतर स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररच्या कारकिर्दीचा अस्त जवळ आला, अशी चर्चा सुरू असतानाच एटीपी स्पर्धामध्ये सुरेख कामगिरी करत फेडररने तगडय़ा प्रतिस्पध्र्याना धक्के देण्यास सुरुवात केली आहे. जवळपास दोन वर्षे एकही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकता न आलेल्या फेडररने आता जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पोहोचण्याचे ध्येय बाळगले आहे.
या मोसमातील सातव्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या फेडररचे सध्या ८७०० गुण आहेत. जोकोव्हिचने १००१० गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. आता मोसमातील अखेरच्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सचे जेतेपद पटकावून आणखी गुणांची भर घालण्याचा फेडररचा मानस आहे. ‘‘या वर्षांच्या सुरुवातीला मी क्रमवारीचा फारसा विचार केला नव्हता. गेल्या वर्षी मला फक्त एक जेतेपद मिळवता आल्यामुळे मी जेतेपदांकडे लक्ष केंद्रित केले होते. अनेक स्पर्धाच्या अंतिम फेरीत धडक मारताना मी स्वित्र्झलडला डेव्हिस चषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. हे वर्ष माझ्यासाठी यशदायी ठरले असले तरी मी पुढील वर्षी होणाऱ्या ब्रिस्बेन आणि ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेवर लक्ष केंद्रित करणार आहे,’’ असे फेडररने सांगितले.
‘‘अव्वल क्रमांकाच्या दिशेने माझी समाधानकारक प्रगती होत आहे. कोणत्याही क्षणी मी अव्वल क्रमांकावर पोहोचू शकतो. अव्वल क्रमांकावर पुन्हा झेप घ्यायला मला नक्कीच आवडेल. त्यासाठी आणखी काही स्पर्धाची जेतेपदे मला मिळवावी लागतील,’’ असे १७ ग्रँड स्लॅम जेतेपदांना गवसणी घालणाऱ्या फेडररने सांगितले.

Story img Loader