‘‘दिल्लीकरांनो, तुम्हाला माहीत नाही की मी दिल्लीत खेळण्यासाठी किती उत्सुक आहे. सामानाची बांधाबांध करतोय. आणखी काय वस्तू बॅगेत टाकू?’’.. हे ‘ट्विट’ केले आहे ‘आधुनिक टेनिसचा राजा’ रॉजर फेडररने. इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग (आयपीटीएल)मध्ये ‘इंडियन एसेज’ या भारतीय संघाचे फेडरर प्रतिनिधित्व करत आहे. मनिला आणि सिंगापूर टप्प्यात खेळू न शकलेला फेडरर भारतात नक्की खेळणार आहे. गुणतालिकेत तीन गुणांच्या आघाडीसह अव्वल स्थानी असणाऱ्या आपल्या संघाला विजयपथावर राखण्यासाठी फेडररने दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे.
अफलातून शैलीसह १४ ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असणारा पीट सॅम्प्रस आता व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त झाला आहे. मात्र त्याच्या खेळाचे, शैलीचे, त्याने गाजवलेल्या पर्वाचे दाखले आजही दिले जातात. फेडरर-सॅम्प्रसला एकत्रित खेळण्याची अतिदुर्मीळ संधी टिपण्यासाठी दिल्लीकर सज्ज झाले आहेत. या दोघांच्या साथीला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला नोव्हाक जोकोव्हिच खेळणार असल्याने टेनिसरसिकांसाठी सुवर्णमय अशी मेजवानी आहे.
३,५०० ते ४९,००० रुपये अशा विविध स्तरांमध्ये उपलब्ध झालेल्या या टेनिसमैफलीच्या तिकिटांना चाहत्यांचा अभूतपूर्व मिळाला असून, संकेतस्थळावर उपलब्ध झाल्यापासून २०व्या मिनिटाला ‘हाऊसफुल्ल’ची पाटी झळकली होती.
देशांतर्गत टेनिसच्या लढतींना प्रेक्षकांची वानवा असताना आयपीटीएलच्या तिकिटांना मिळालेला प्रतिसाद संयोजकांनाही आश्चर्यचकित करणारा आहे.  
धमाल-मस्ती स्वरूप असले तरी तुल्यबळ खेळाडू असल्याने प्रत्येक गुणासाठी रंगणारा मुकाबला चुरशीचा होत असल्याने चाहत्यांना दर्जेदार खेळ पाहायला मिळणार आहे. दरम्यान, वैयक्तिक कारणांमुळे आंद्रे आगासी, सेरेना विल्यम्स भारतात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा