ग्रँडस्लॅम जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी आतूर रॉजर फेडररने ब्रिस्बेन टेनिस स्पर्धेत केवळ ३९ मिनिटांत वेगवान विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. फेडररने वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळवलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थचा ६-०, ६-१ असा धुव्वा उडवला.
अफलातून खेळाचे प्रदर्शन करत फेडररने पहिला सेट १६ मिनिटांत जिंकला. क्रॉसकोर्ट, एकहाती बॅकहँड, ताकदवान फोरहँड आणि नेटजवळून सुरेख खेळ करणाऱ्या फेडररने दुसरा सेट २३ मिनिटांत जिंकत सामन्यावर कब्जा केला. फेडररने २४ थेट फटक्यांसह डकवर्थला निष्प्रभ केले. १७ ग्रँडस्लॅम जेतेपदांचा मानकरी असलेल्या फेडररच्या झंझावातासमोर डकवर्थला कसाबसा एक गुण कमावता आला. तब्बल १२ बिनतोड सव्‍‌र्हिस करत फेडररने डकवर्थला नामोहरम केले.
‘‘ज्या पद्धतीने मी खेळलो ते आनंददायी होते. मी चांगली सव्‍‌र्हिस केली, आक्रमक खेळ केला, परतीच्या फटक्यांमध्येही अचूकता राखली. डकवर्थवर सातत्याने दडपण राखण्यात यश मिळवले. त्यामुळेच वर्चस्व गाजवत विजय मिळवला,’’ असे फेडररने सांगितले. उपांत्य फेरीत फेडररचा मुकाबला चौथ्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हशी होणार आहे. ग्रिगोरने स्लोव्हाकियाच्या मार्टिन क्लिझानवर ६-३, ६-४ असा विजय मिळवला.
अन्य लढतीत जपानच्या केई निशिकोरीने ऑस्ट्रेलियाच्या बरनॉर्ड टॉमिकवर ६-०, ६-४ अशी मात केली.

Story img Loader