म्हाताऱ्या वाघाची छोटीशी शिकार करतानाही दमछाक होते, मात्र वाघ त्याची शिकार अर्धवट सोडत नाही. आधुनिक टेनिसचा राजा आणि तब्बल १७ ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या रॉजर फेडररला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीतच गेइल मॉनफिल्सच्या रूपात खडतर आव्हानाला सामोरे जावे लागले. दोन मॅचपॉइंट वाचवत आणि सगळा अनुभव पणाला लावत फेडररने मॉनफिल्सचे आव्हान मोडून काढत उपान्त्य फेरीत आगेकूच करत श्रेष्ठ कोण हे सिद्ध केले. अन्य लढतींत क्रोएशियाच्या मारिन चिलीचने टॉमस बर्डीचवर मात करत उपान्त्य फेरी गाठली.
राफेल नदालने दुखापतीतून माघार घेतल्यामुळे तसेच नोव्हाक जोकोव्हिच, अँडी मरे दुसऱ्या गटात असल्यामुळे फेडरर अंतिम फेरी सहज गाठेल असे भाकीत टेनिसपंडितांनी वर्तवले होते. मात्र फेडरर-मॉनफिल्स लढतीने ही भाकीते फोल ठरवली आहेत. तांत्रिकदृष्टय़ा फेडररने हा सामना ४-६, ३-६, ६-४, ७-५, ६-२ असा जिंकला. मात्र ज्या पद्धतीने मॉनफिल्सने पहिल्या सत्रात फेडररवर वर्चस्व गाजवले त्याचे वर्णन अद्भुत असे करावे लागेल.
३३ वर्षीय द्वितीय मानांकित फेडरर हा सर्वाधिक वयस्कर ग्रँडस्लॅम विजेता होण्यासाठी प्रयत्नशील आहे. २००४ ते २००८ या कालावधीत अमेरिकन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा फेडरर या स्पर्धेचे सहावे जेतेपद मिळवण्यासाठी शर्यतीत आहे. दोन सेट गमावल्यानंतर सामना जिंकण्याची फेडररची ही नववी वेळ आहे.
पहिला आणि दुसरा सेट जिंकत मॉनफिल्सने शानदार सुरुवात केली. मात्र यानंतर फेडररने ठेवणीतल्या फटक्यांची पोतडी उघडली. एकहाती बॅकहँड, ड्रॉप, क्रॉसकोर्ट यांचा पुरेपूर उपयोग करत त्याने चौथ्या सेटमध्ये मॅचपॉइंट वाचवले. पाचव्या सेटमध्ये झंझावाती खेळासह त्याने मॉनफिल्सला निष्प्रभ करत विजय मिळवला.
अन्य लढतीत १४व्या मानांकित चिलीचने सहाव्या मानांकित टॉमस बर्डीचवर ६-२, ६-४, ७-६ (७-४) अशी मात केली. १९९६ नंतर अमेरिकन खुल्या स्पर्धेत अंतिम चारमध्ये धडक
मारणारा चिलीच क्रोएशियाचा पहिला खेळाडू ठरला आहे.

Story img Loader