गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
गुडघ्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर १७ ग्रँड स्लॅम नावावर असलेला स्वित्र्झलडचा महान टेनिसपटू रॉजर फेडरर एक महिना टेनिस कोर्टपासून दूर राहणार आहे, अशी माहिती त्याचा व्यवस्थापक टॉनी गॉडसिकने दिली. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेच्या उपांत्य फेरीनंतर फेडररच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, असे गॉडसिकने सांगितले. एका महिन्याच्या विश्रांतीमुळे फेडररला रॉटरडॅम आणि दुबई येथे होणाऱ्या एटीपी स्पर्धाना मुकावे लागणार आहे.
‘‘रोटरडॅम व दुबई स्पध्रेत खेळता येणार नसल्याचे दु:ख आहे. एटीपी वर्ल्ड टुर स्पर्धामधील या माझ्या आवडीच्या स्पर्धा आहेत. कारकिर्दीतील ही दुर्दैवी माघार म्हणावी लागेल. मात्र, इतक्या प्रदीर्घ कारकिर्दीत स्वत:ला तंदुरुत ठेवले याचा आनंद आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्याची खात्री डॉक्टरांनी घेतली. योग्य पुनर्वसनानंतर मी कोर्टवर लवकरच परतेन,’’ असा विश्वास फेडररने व्यक्त केला.
३४ वर्षीय फेडररला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेच्या उपांत्य फेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचविरुद्ध १-६, २-६, ६-३, ३-६ असा पराभव पत्करावा लागला. जोकोव्हिचविरुद्धच्या ग्रँड स्लॅम स्पध्रेतील दहा सामन्यांत फेडररला केवळ दोन विजय मिळवता आले आहेत. २०१२च्या विम्बल्डन स्पध्रेच्या उपांत्य फेरीत फेडररने जोकोव्हिचवर अखेरचा विजय मिळवला होता. फेडररचा हा अखेरचा ग्रँड स्लॅम विजय होता. २०१४च्या एटीपी वर्ल्ड टुर फायनल्स (लंडन) स्पध्रेच्या अंतिम सामन्यात दुखापतीमुळे फेडररने माघार घेतली होती. मात्र, आठवडय़ाच्या विश्रांतीनंतर त्याने स्वित्र्झलडला डेव्हिस चषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.