वर्षांतील अखेरची ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची मानांकन यादी जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये एकेकाळी टेनिस क्षेत्रावर मर्दुमकी गाजवत स्वत:चे संस्थान निर्माण करणाऱ्या रॉजर फेडररला सातवे मानांकन देण्यात आल्यामुळे सर्वानाच धक्का बसला आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये अव्वल तीन स्थानांनंतरचे मानांकन मिळण्याची फेडररची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २००२ साली फेडररला याच स्पर्धेत १२वे मानांकन देण्यात आले होते. या स्पर्धेची मानांकने एटीपी क्रमवारीनुसार देण्यात येतात. जागतिक टेनिस क्रमवारीमध्ये फेडरर सध्या सातव्या स्थानावर असल्याने त्याच्यावर ही नामुष्की ओढवली आहे.
पुरुषांच्या गटात नोव्हाक जोकोव्हिच अग्रस्थानावर असून राफेल नदाल आणि गतविजेता अँडी मरे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.
महिलांच्या मानांकनामध्ये सेरेना विल्यम्स अव्वल स्थानावर असून व्हिक्टोरिया अझारेन्का आणि मारिया शारापोव्हा यांना अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान देण्यात आले आहे.
स्पर्धेची मानांकने पुढीलप्रमाणे
पुरुष : १. नोव्हाक जोकोव्हिच, २. राफेल नदाल, ३. अँडी मरे, ४. डेव्हिड फेरर, ५. थॉमस बर्डीच, ६. जुआन मार्टिन डेल पोट्रो, ७. रॉजर फेडरर, ८. रिचर्ड गॅसक्वेट, ९. स्टेनिस्लास वावरिंका, १०. मिलोस राओनिक.
महिला : १. सेरेना विल्यम्स, २. व्हिक्टोरिया अझारेन्का, ३. मारिया शारापोव्हा, ४. अग्निस्का रॅडवान्स्का, ५. सारा इराणी, ६. लि ना, ७. कॅरोलिन वोझ्नियाकी, ८. पेट्रा क्विटोव्हा, ९. अँजेलिक केर्बर, १०. जेलेना जाकोव्हिच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा