रॉजर फेडरर व सेरेना विल्यम्स या माजी जगज्जेत्या टेनिसपटूंनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत शानदार सुरुवात केली. व्हीनस विल्यम्स व अग्निस्झेका रॅडवान्स्का यांनीही विजयी सलामी केली.
माजी विजेत्या फेडररने पहिल्या फेरीत स्लोव्हाकियाच्या लुकास लॅकोवर ६-२, ६-४, ६-२ असा सरळ तीन सेट्समध्ये विजय मिळविला. स्वित्र्झलडच्या फेडररने परतीचे वेगवान फटके व नेटजवळून अचूक प्लेसिंग असा बहारदार खेळ केला. त्याने केलेल्या वेगवान खेळापुढे लुकासचा बचाव निष्प्रभ ठरला.
सहाव्या मानांकित टॉमस बर्डीचनेही विजयी प्रारंभ केला. त्याने कॅनडाच्या पीटर पोलनस्की याच्यावर ६-३, ६-४, ६-४ अशी मात केली. त्याने क्रॉसक्रोर्ट फटक्यांचा उपयोग करत हा सामना जिंकला.
आठव्या मानांकित मिलोस राओनिकने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओस याच्यावर मात करत दुसरी फेरी गाठली. त्याने हा सामना ६-३, ७-६ (७-१), ६-३ असा जिंकला. मिखाईल यॉझनीला पहिल्याच सामन्यात विजय मिळवण्यासाठी झगडावे लागले. त्याने उत्कंठापूर्ण लढतीत स्पेनच्या पाब्लो कॅरोनो बुस्टाचा ३-६, १-६, ६-३, ६-४, ६-० असा पराभव केला. पहिले दोन सेट्स गमावल्यानंतर त्याने सव्‍‌र्हिस व परतीच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवत विजयश्री खेचून आणली.
महिलांमध्ये, व्हीनसने बेलिंडा बेन्किक हिच्यावर ६-४, ६-१ असा सरळ दोन सेट्समध्ये विजय मिळविला. २९ व्या मानांकित व्हीनसला पहिल्या सेटमध्ये झुंजावे लागले. त्या तुलनेत दुसरा सेट तिने एकतर्फी घेतला. तिची बहीण सेरेना हिने फ्रान्सच्या एलिझ लिम हिचे आव्हान ६-२, ६-१ असे संपुष्टात आणले. दोन्ही सेटमध्ये सेरेनाने निर्विवाद वर्चस्व गाजवले. तिने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांबरोबरच लॉब्जचाही सुरेख खेळ केला.
पोलंडच्या अग्निस्झेकाने चीनची शुई झांग हिच्यावर ६-३, ६-० असा सफाईदार विजय मिळविला. तिसरे मानांकन मिळालेल्या अग्निझेका हिने पहिल्या सेटमध्ये सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला. दुसऱ्या सेटमध्ये तिने तीन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळवित सहज हा सेट घेतला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा