फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत झालेला पराभव बाजूला सारत विम्बल्डन स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे रॉजर फेडररने हॅले स्पर्धेच्या जेतेपदासह सिद्ध केले. गतविजेत्या फेडररने इटलीच्या आंद्रेस सेप्पीवर ७-६ (७-१), ६-४ असा विजय मिळवला. या स्पर्धेचे हे फेडररचे आठवे जेतेपद आहे. यंदाच्या हंगामातील फेडररचे हे चौथे जेतेपद आहे. याआधी त्याने ब्रिस्बेन, दुबई आणि इस्तंबूल येथील स्पर्धामध्ये जेतेपदाची कमाई केली होती.
कारकीर्दीत ग्रास कोर्टवरील फेडररचे हे १५वे तर एकूण ८६वे जेतेपद आहे. कारकीर्दीत १८वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्यासाठी फेडरर आतूर आहे. काही दिवसांतच सुरू होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेसाठीची रंगीत तालीम असे वर्णन होणाऱ्या हॅले स्पर्धेचे जेतेपद फेडररचा आत्मविश्वास उंचावणारे आहे.
दरम्यान क्वीन्स क्लब टेनिस स्पर्धेत अँडी मरेने अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीच्या लढतीत व्हिक्टर ट्रॉइकीला ६-३, ७-६ (४) असे नमवत मरेने अंतिम फेरी गाठली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा