डेव्हिस कपसाठी निवडण्यात आलेल्या संघामध्ये भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्नाची निवड न झाल्याबद्दल त्याने ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) जाहीर निषेध केला आहे.  नवीन वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध डेव्हिस कप खेळला जाणार आहे. त्या संघासाठी रोहन बोपन्नाचे नाव वगळण्यात आल्यामुळे त्याने एआयटीएच्या धोरणावर टीका केली आहे.

एआयटीएनी भारतीय संघाचे न खेळणारा कर्णधार म्हणून महेश भूपतीची निवड केली आहे. याआधी या पदावर आनंद अमृतराज हे होते. डेव्हिस कपमध्ये होणार असलेला सामना हा अमृतराज यांचा या पदावरील शेवटचा सामना ठरणार आहे.
रोहन बोपन्ना हा भारतातील प्रथम क्रमांकाचा तर जगातील २८ व्या क्रमांकाचा खेळाडू आहे.

आठ डिसेंबर रोजी मला एआयटीएकडून विचारणा झाली होती. डेव्हिस चषकासाठी मी खेळू शकतो का असे त्यांनी विचारले होते. मी माझा होकार तेव्हाच कळवला होता. परंतु मला माध्यमांकडूनच कळले की माझा संघातच समावेश झाला नाही. मी संघात नाही हे कळवणारा साधा एक इमेल देखील मला करण्यात आला नाही. फेडरेशनच्या कार्यालयातून कुणी मला काहीच कळवले नाही याचे मला अतोनात दुःख झाल्याचे बोपन्नाने म्हटले.

बोपन्नाचा या चषकात समावेश न करण्याचे कारण तांत्रिक असल्याचे फेडरेशनने म्हटले आहे. बोपन्ना आणि लिएंडर पेस हे दोघेही टेनिस कोर्टाच्या डाव्या बाजूला खेळणारे खेळाडू आहे. जर बोपन्नाला या खेळू दिले तर ती एक घोडचूक ठरू शकते असे एआयटीएनी म्हटले आहे. बोपन्नाने या गोष्टीचा विरोध केला. मी दोन्ही बाजूने खेळू शकतो असे त्याने म्हटले. या देशात सर्वात चांगले मानांकन असणारा मी खेळाडू आहे. माझे दुहेरीतील मानांकन भारतात सर्वात चांगले असताना माझी निवडच योग्य होती. जर मी केवळ डाव्या बाजूलाच खेळू शकलो असतो तर माझे मानांकन इतके वर जाऊ शकले असते का असा प्रश्न त्याने विचारला.

निवड प्रक्रियेसाठी जगभरात केवळ मानांकन हाच एक निकष लावला जात असताना एआयटीए ज्या पद्धतीने निवड करते त्यावरुन त्यांच्या कारभाराची कल्पना येते असे त्याने म्हटले. क्रमवारीच्या आधारावर निवड झाली तर प्रश्नच मिटतील. एआयटीएने एक योग्य पद्धत अवंलबली पाहिजे असे त्याने म्हटले. बोपन्नाऐवजी साकेत मायनेनीला लिएंडर पेस सोबत खेळविण्यात येणार आहे. बोपन्ना आणि लिएंडर पेसला रिओ ऑलिम्पिकच्या पहिल्याच फेरीमध्ये बाहेर पडावे लागले होते.