इंदूर येथे ३१ जानेवारीपासून तैवानविरुद्ध रंगणाऱ्या डेव्हिस चषक स्पर्धेतील आशिया-ओशियाना ग्रूप-१ मधील लढतीसाठी रोहन बोपण्णाने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर बोपण्णा भारतीय संघात परतला आहे.
दुहेरीतील अव्वल खेळाडू लिएण्डर पेसने कौटुंबिक कारणास्तव या मोसमात भारताचे प्रतिनिधित्व करणार नसल्याचे अखिल भारतीय टेनिस महासंघाला कळवले आहे. त्याचबरोबर महेश भूपतीला वगळण्यात आल्यामुळे बोपण्णावर भारताच्या दुहेरी संघाची मदार असणार आहे. साकेत मायनेनी हा दुहेरीतील त्याचा साथीदार असणार आहे. सोमदेव देववर्मन आणि युकी भांबरी यांच्यावर एकेरीची भिस्त असणार आहे.
जीवन मेदुनचेझियान याच्याविरुद्धची एकेरीतील आणि चेन्नई खुल्या स्पर्धेतील सुरेख कामगिरीमुळे मायनेनीला भारतीय संघात स्थान मिळाले. जीवन आणि सनम सिंग यांना राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान मिळाले आहे. चेन्नई खुल्या स्पर्धेत सोमदेववर रोमहर्षक विजय मिळवणारा उदयोन्मुख खेळाडू रामकुमार रामनाथन याला विशेष निमंत्रित म्हणून संधी मिळाली आहे. बंगळुरू येथे इंडोनेशियाविरुद्ध झालेल्या गेल्या लढतीत सनम सिंग भारतीय संघाचा भाग होता. राखीव खेळाडूंच्या यादीतून विजयंत मलिक आणि एन. श्रीराम बालाजी यांना डच्चू देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा