डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत जागतिक गटात स्थान मिळवण्याच्या उद्देशाने भारताने दमदार आगेकूच केली. पहिल्या दिवशी बरोबरीत समाधान मानावे लागलेल्या भारताने शनिवारी झालेल्या दुहेरीच्या लढतीत कोरियावर मात करत यशस्वी वाटचाल केली. प्रतिष्ठेच्या जागतिक गटातील प्रवेशापासून भारतीय संघ केवळ एक विजय दूर आहे.
आशिया/ओशियाना गट-१ लढतीत भारताच्या रोहन बोपण्णा आणि साकेत मायनेनीने कोरियाच्या ह्य़ुंग ताइक ली आणि लिम यांग क्यु जोडीवर ७-६ (४), ५-७, ७-६ (२), ६-३ असा विजय मिळवला. या विजयासह भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे.
डेव्हिस चषकाच्या निमित्ताने केवळ दुसऱ्यांदाच एकत्र खेळणाऱ्या बोपण्णा-मायनेनी जोडीने चिवटपणे खेळ करत कोरियाचे आव्हान परतवले. रविवारी होणारी लढत जिंकल्यास भारताला पहिल्यांदाच विदेशी भूमीवर कोरियाला नमवण्याची संधी आहे. कोरियाविरुद्धची ३-६ अशी कामगिरीही भारताला सुधारता येऊ शकते. गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या लढतीत कोरियाने भारतावर ४-१ असा विजय मिळवला होता. तैपेईचा ५-० असा धुव्वा उडवल्यानंतर भारतीय संघ या गटातून आगेकूच करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Story img Loader