लखनऊ : भारताचे नेतृत्वपद भूषवताना युवा पिढीला मार्गदर्शन करतानाच भविष्याच्या दृष्टीने कर्णधार घडवण्याचे माझे उद्दिष्ट आहे, असे मत भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी रणजी स्पर्धेकडे दुर्लक्ष न करता तेथे सातत्यपूर्ण कामगिरी करा, असेही रोहितने सुचवले आहे. रोहितकडे भारताच्या तिन्ही प्रकारांतील संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून व्यग्र कार्यक्रमातही रोहितने ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत सर्व सामने खेळण्याची इच्छा प्रकट केली आहे. तसेच प्रशिक्षक द्रविडच्या साथीने ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताचा सर्वोत्तम संघ निवडण्याच्या दृष्टीने चाचपणी करत असल्याचे रोहित पहिल्या लढतीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला.
‘‘मलासुद्धा कारकीर्दीत कर्णधार म्हणून घडवण्यासाठी अनेकांनी विविध टप्प्यांवर मार्गदर्शन केले. सध्या राहुल, पंत, बुमरा यांसारखे भविष्यातील नेतृत्वाचे पर्याय भारताकडे उपलब्ध असले तरी मी त्यांच्यासह आणखी काही खेळाडूंवरही लक्ष ठेवून आहे,’’ असे रोहित म्हणाला. ‘‘करोनाकाळात खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. परंतु आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने आम्ही संघबांधणी करत आहोत. माझी तंदुरुस्ती उत्तम असल्याने विश्वचषकापर्यंत तरी विश्रांती घेण्याचा विचार करणार नाही,’’ असे रोहितने नमूद केले. मे महिन्यात ‘आयपीएल’ संपल्यानंतर भारताचे खेळाडू आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहेत. तेथून मग तिन्ही प्रकारच्या मालिकांसाठी ते इंग्लंडला रवाना होतील. त्यानंतर मग आशिया चषकात अंतिम चाचपणी करून भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी सज्ज होईल.
संघ
- भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, यजुर्वेद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, आवेश खान, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार.
- श्रीलंका : दसुन शनका (कर्णधार), पथुम निसंका, चरिथ असलंका, दिनेश चंडिमल, कुशल मेंडिस, दानुष्का गुणथिलका, कमिल मिशारा, जनिथ लियांगे, चमिका करुणारत्ने, दुश्मंता चमीरा, लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नाडो, शिरान फर्नाडो, महीष थिक्षणा, प्रवीण जयविक्रमा, अशियान डॅनिएल, जेफ्री वॉडर्से.
- वेळ : सायं. ७ वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी