India vs New Zealand, World Cup 2023: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ २०२३चा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. रविवारी होणारी फायनल भारताने जिंकली तर ते तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकेल. बुधवारी (१५ नोव्हेंबर) विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध ७० धावांनी शानदार विजय मिळवल्यानंतर, रोहित शर्माने कबूल केले की टीम इंडिया मैदानात थोडासे खराब क्षेत्ररक्षण केले.
सामन्यानंतर रोहित शर्माने किवी फलंदाज डॅरिल मिचेल आणि केन विल्यमसन यांचेही कौतुक केले, ज्यांनी १८१ धावांची भागीदारी केली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक उपांत्य सामन्यात, विराट कोहलीचे विक्रमी ५०वे एकदिवसीय शतक आणि मोहम्मद शमीचे ७ विकेट्स हे खास आकर्षण होते.
रोहित म्हणाला, ‘टीम इंडिया क्षेत्ररक्षणात थोडीशी ढिलाई होती’
सामन्यानंतर रोहित म्हणाला, “मी येथे खूप क्रिकेट खेळलो आहे, वानखेडेच्या मैदानावर कितीही धावसंख्या असली तरी तुम्ही मजबूत स्थितीत आहात असं मानू शकत नाही. तुम्ही मैदानावर निवांत होऊन चालत नाही. सतत चांगली खेळी करावी लागते. आमच्यावर दबाव असेल याची आम्हाला कल्पना होती. आम्ही मैदानावर थोडे निष्काळजी असलो तरी खूप शांत होतो. या गोष्टी (मिशेल आणि केन यांच्यातील भागीदारी) नक्कीच घडणार आहेत, परंतु आम्ही आमचे १०० टक्के देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे.”
हेही वाचा:
रोहित पुढे म्हणाला, “आम्ही अडचणीत असतो जर भारताने ३०-४० धावा कमी केल्या असत्या तर संघाने हा धोका पत्करला नसता, हे सांगणे कठीण आहे. विल्यमसन आणि मिचेल यांनी शानदार फलंदाजी केली. आमच्यासाठी शांत राहणे महत्त्वाचे होते. चाहते शांत झाले होते. पण आम्हाला कळत होतं की एक विकेट इथे हवी आहे, मग ती झेल किंवा धावबाद असो. शमी अप्रतिम गोलंदाजी करत होता. सर्व खेळाडू फॉर्मात आहेत, अव्वल पाच-सहा फलंदाज, त्यांना जेव्हा-जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्यांनी त्याचा फायदा घेतला. अय्यरने या स्पर्धेत आमच्यासाठी काय केले, याचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही. गिलने आमच्यासाठी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती अप्रतिम आहे. दुर्दैवाने त्याला पेटके आल्याने मैदान सोडावे लागले.”
भारतीय कर्णधार पुढे म्हणाला, “कोहलीने जे केले ते केले, त्याच्यासाठी आता माझ्याकडे शब्द नाहीत. त्याने आपले ऐतिहासिक शतकही पूर्ण केले. इंग्लंडविरुद्ध आम्ही २३० धावा केल्या, गोलंदाजांनी ज्या पद्धतीने नवीन चेंडूने गोलंदाजी केली ती अप्रतिम होती. साहजिकच ही सेमीफायनल होती, मी असे म्हणणार नाही की कोणतेही दडपण नव्हते. जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा दडपण असते. उपांत्य फेरीत थोडी जास्त दबाव असतो, आम्हाला त्याबद्दल जास्त विचार करायचा नव्हता. इथे आम्ही पहिल्या नऊ सामन्यामध्ये जे करत होतो तेच इथे केले. दुसऱ्या सत्रामध्ये आमच्यासाठी गोष्टी अधिक सोप्या झाल्या नाहीत, थोडा संघर्ष करावा लागला. टीम इंडिया क्षेत्ररक्षणात थोडी कमी पडली. त्यात सुधार करणे गरजेचे आहे.”
भारताने धावांचा डोंगर उभारला आणि न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम खेळताना भारताने ५० षटकांत ४ बाद ३९७ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा (२९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४७ धावा) आणि शुबमन गिल (६६ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८० धावा) यांनी ७१ धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली.
विराट कोहलीने (११३ चेंडूत ११७ धावा, नऊ चौकार आणि दोन षटकार) आपले ५०वे एकदिवसीय शतक झळकावले, तर श्रेयस अय्यरने (७० चेंडूत १०५ धावा, चार चौकार आणि आठ षटकार) सलग दुसरे विश्वचषक शतक झळकावले. ज्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत झाली. के.एल. राहुलनेही २० चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३९ धावांची खेळी केली. किवी संघाकडून टीम साऊदी (३/१००) सर्वोत्तम गोलंदाज ठरला. ट्रेंट बोल्ट (१/८६) यालाही एक विकेट मिळाली.
३९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किवी संघाने पहिले दोन गडी गमावले. पण डॅरिल मिचेल (११९ चेंडूत १३४, नऊ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने) आणि कर्णधार केन विल्यमसन (७३ चेंडूत ६९, आठ शतके आणि एका षटकाराच्या मदतीने) १८१ धावांच्या भागीदारीने न्यूझीलंडच्या आशा पल्लवित केल्या होत्या. भारतीय गोलंदाजांना पुनरागमन करण्यासाठी घाम गाळावा लागला. ग्लेन फिलिप्सनेही ४१ धावांची मौल्यवान खेळी खेळली. मात्र, शमीच्या दोन विकेट्सने खेळ बदलला आणि टीम इंडियाने डेथ ओव्हर्समध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत न्यूझीलंडला ४८.५ षटकांत ३२७ धावांत गुंडाळले. शमीशिवाय कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. शमीला त्याच्या अप्रतिम गोलंदाजीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आले.