आपल्या खेळीमुळे क्रीडाप्रेमींच्या मनात स्थान मिळवलेल्या रोहित शर्माने बुधवारी आंतरराष्ट्रीय कसोटी कारकीर्दीला सुरुवात केली. वेस्ट इंडिंजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी फलंदाज रोहित शर्मा आणि मध्यमगती गोलंदाज मोहंमद शमी यांना संधी देण्यात आली आहे. 
गेल्या दोन दशकांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात आपल्या शैलीदार खेळीने अधिराज्य गाजविणाऱया मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कसोटी कारकीर्दीतील ही अखेरची मालिका आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांनंतर सचिन तेंडुलकर सर्व प्रकारच्या क्रिकेटला रामराम ठोकणार आहे. याच सचिन तेंडुलकरने बुधवारी पहिली आंतरराष्ट्रीय कसोटी खेळणाऱया रोहित शर्माला टोपी दिली. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर पहिला कसोटी सामना बुधवारपासून सुरू झाला. त्यामध्ये सचिनने रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात स्वागत केले. मोहंमद शमी याला इशांत शर्मा याने टोपी घालून त्याचे आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये स्वागत केले. इशांत शर्मा, उमेश यादव, अमित मिश्रा आणि अजिंक्य राहणे यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अंतिम ११ जणांच्या संघात स्थान मिळालेले नाही.

Story img Loader