‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात द्विशतक झळकावल्यावर माझे आणि रोहितचे बोलणे झाले होते. त्यावेळी मी त्याला सांगितले की, या खेळीच्या जोरावर तुझे कसोटी पदार्पणाचे स्वप्न साकारू शकते आणि संधी मिळाल्यास ती सोडू नकोस. त्यावर रोहित म्हणाला होता की, सर काळजी करू नका. संधी मिळाली की पदार्पणाचा सामना अविस्मरणीय करून दाखवेन. गुरुवारी ईडन गार्डन्सवर पदार्पणात शतक ठोकून त्याने दिलेला शब्द पाळला. त्याच्या या खेळीबद्दल काय बोलणार, त्याची ही खेळी शब्दांत वर्णन करता येणार नाही. त्याने या खेळीने त्याचा दर्जा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे आणि त्यामुळेच या खेळीचा मला सार्थ अभिमान आहे,’’ असे रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी सांगितले.
रोहितमधील गुणवत्तेची स्तुती बऱ्याच क्रिकेटपटूंनी केली आहे, पण तो आपल्या कारकिर्दीबद्दल गंभीर नसल्याचे म्हटले जायचे. पण त्याच्या कारकिर्दीत असाच एक कलाटणी देणारा क्षण आला आणि रोहित बदलला. याबाबत लाड म्हणाले की, ‘‘२०११च्या विश्वचषकाच्या भारतीय संघात रोहितला स्थान देण्यात आले नव्हते, त्यावेळी त्याला नैराश्येने ग्रासले होते. सर, आता भारतीय संघात पुनरागमन करणे कठीण आहे, असं तो सांगत होता. त्यावेळी मी त्याची समजूत काढली, त्याला सकारात्मक गोष्टी सांगितल्या, जे एका प्रशिक्षकाचे काम असते तेच मी केले. रोहित त्यावेळी ‘बॅड पॅच’मध्ये होता. त्यामधून त्याला बाहेर काढायला मी मदत केली. त्याच्यामध्ये गुणवत्ता होतीच आणि त्याच्या जोरावरच तो पुढे आला.’’
रोहितबाबत ते पुढे म्हणाले की, ‘‘रोहितवर बऱ्याच टीका झाल्या, टीकाकार असणे चांगले असते. त्यामुळेच आपल्याला आपले स्थान समजत असते. त्याची द्विशतकीय खेळी हा एक दर्जेदार नजराणा होता, त्यामध्ये कुठेही आततायीपणा नव्हता. आता कसोटी पदार्पणात शतक झळकावत रोहितने एक पाऊल पुढे टाकले आहे. या खेळीने संघाला विजय मिळवून देणे रोहितसाठी फार महत्त्वाचे आहे.’’
स्वप्न साकार झाले -मनोहर शर्मा
रोहितला लहानपणापासून क्रिकेटची दीक्षा देणारे त्याचे काका मनोहर शर्मा यांनी आपले स्वप्न साकार झाल्याची भावना व्यक्त केली. ‘‘कसोटी क्रिकेट हा खेळाचा आत्मा आहे आणि त्यामध्ये रोहितने कारकीर्द घडवावी, ही माझी आणि माझा भाऊ रवीची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. कारकीर्दीतील कठीण कालखंडावर मात करून रोहितने त्याची कारकीर्द उभी केली आहे. पदार्पणात शतक झळकावण्याची किमया त्याने साधली, पण त्यापेक्षाही संघासाठी तो धावून आला, हे महत्त्वाचे आहे,’’ असे मनोहर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा