एकदिवसीय मालिकेत धावांसाठी झगडणाऱ्या भारतीय फलंदाजांनी सराव सामन्यात खेळपट्टी आणि वातावरणाशी जुळवून घेत अपेक्षित अभ्यास केला. सराव सामन्याचा निर्णय अनिर्णीत राहिला असला तरी भारतीय खेळाडूंनी आपल्या कच्च्या दुव्यांवर लक्ष देत परिपक्व होण्यासाठी प्रयत्न केले.  
न्यूझीलंड इलेव्हनविरुद्ध बिनबाद ४१ वरून दुसऱ्या दिवशी पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाने ३१३ धावांची मजल मारत कसोटी मालिकेसाठी आपली तयारी केली. कालच्या धावसंख्येत भर न घालता मुरली विजय तंबूत परतला. त्याने १९ धावा केल्या. शिखर धवनची २६ धावांची खेळी अचूक धावफेकीमुळे संपुष्टात आली. भारताचा रनमशीन ठरलेल्या चेतेश्वर पुजाराने ३३ धावा करत डाव सावरला. कसोटी संघात स्थान पक्के करण्याची संधी असलेल्या मुंबईकर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी खेळी करत कसोटी मालिकेकरिता सज्ज असल्याचे दाखवून दिले. रोहितने ७ चौकारांसह ५९ धावांची खेळी केली, तर अजिंक्यने ५ चौकार आणि एका षटकारासह ६० धावा फटकावल्या. राखीव फलंदाज अंबाती रायुडूने ४९ धावा करत धावसंख्या वाढवली. गोलंदाज म्हणून संघात असलेल्या रविचंद्रन अश्विनने सराव सामन्यातही फलंदाजाची चुणूक दाखवत ६ चौकार आणि २ षटकारांसह ४६ धावांची आक्रमक खेळी साकारली.
 धोनीच्या ऐवजी संधी मिळालेल्या वृद्धिमान साहाला केवळ ४ धावाच करता आल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ७ बाद ३१३ धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्धची पहिली कसोटी ६ फेब्रुवारीपासून ऑकलंड येथे सुरू होत आहे.

सरावाचे उद्दिष्ट साध्य -रोहित शर्मा
व्हांगेरी : कसोटी मालिकेपूर्वी काही गोष्टींवर काम करणे आवश्यक होते. या सराव सामन्याद्वारे आम्ही योजलेल्या गोष्टींवर काम केल्यामुळे अपेक्षित सराव झाला, असे रोहित शर्माने सांगितले. ‘‘सर्वच फलंदाजांनी खेळपट्टी आणि वातावरणाशी जुळवून घेत धावा केल्या. गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केला. त्यामुळे या सराव सामन्यात खेळण्याचा उद्देश सफल झाला. ईश्वर पांडेने सुरेख गोलंदाजी केली. मुरली विजय आणि शिखर धवन चांगल्या सुरुवातीनंतर बाद झाले. संघ म्हणून एकत्रित कामगिरी चांगली करण्याचा आमचा प्रयत्न असेल,’’ असे रोहित ंम्हणाला.