बोटाला झालेल्या दुखापतीमुळे सुमारे तीन महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या रोहित शर्माने गुरुवारी दणक्यात पुनरागमन करत श्रीलंकेविरुद्ध विश्वविक्रमी द्विशतक झळकावले. चेंडू हा फक्त टोलवण्यासाठीच असतो, क्रिकेट हा फक्त फलंदाजांचा खेळ आहे, ही वाक्ये रोहितने पुन्हा एकदा सत्यात उतरवली. अभिजात शैली, फटक्यांमधली सहजता, गोलंदाजीचे चिंधडय़ा उडवण्याचे धैर्य, पुनरागमन कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखवत रोहितने २६४ धावांची ऐतिहासिक खेळी केली. त्याची फलंदाजी पाहताना केवळ ईडन गार्डनवरीलच नव्हे तर जगभरातील क्रिकेटरसिकांच्या डोळय़ांचे पारणे फिटले. कारकिर्दीतील दुसरे द्विशतक झळकावताना रोहितने वीरेंद्र सेहवागच्या सर्वोच्च धावसंख्येला मागे टाकले. विशेष म्हणजे, या खेळीत त्याने तडकावलेले ३३ चौकार हाही एकदिवसीय क्रिकेटमधील नवा विक्रम ठरला. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यामध्ये १५३ धावांनी दणदणीत विजय मिळविला.

Story img Loader