पीटीआय, मेलबर्न

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज आकाश दीप यांना रविवारी सरावादरम्यान अनुक्रमे गुडघा आणि हाताला दुखापत झाली. मात्र, आमची दुखापत फारशी गंभीर नसल्याचे आकाश दीपने सरावानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी सुरू असलेल्या कसोटी मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी असून चौथा सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. या मैदानाबाहेरच झालेल्या सराव सत्रादरम्यान रोहित आणि आकाश या दोघांनाही फलंदाजी करताना दुखापत झाली.

हेही वाचा >>>Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाची हिंदीत उत्तरं आणि ऑस्ट्रेलियन मीडियाचा संताप, नेमकं काय घडलं?

‘थ्रो-डाऊन’ला सामोरे जाताना रोहितच्या गुडघ्याला चेंडू आदळला. त्यानंतरही त्याने फलंदाजी सुरू ठेवली. मात्र, थोड्या वेळाने अधिक वेदना होऊ लागल्यानंतर त्याने उपचार घेतले. तो गुडघ्याला बर्फ लावून काही काळ बसून राहिला. त्यानंतर चालताना त्याला थोडी अडचण येत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे, आकाशच्या हाताला चेंडू लागला.

‘‘क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या दुखापती होतच असतात. आम्हाला सरावासाठी देण्यात आलेली खेळपट्टी ही बहुधा मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी वापरण्यात येणारी होती. त्यामुळे चेंडू बरेचदा खाली राहत होता. मात्र, चिंतेचे कारण नाही,’’ असे आकाश दीपने सरावानंतर सांगितले.

हेही वाचा >>>PM Modi’s Letter To Ashwin : “तुझ्या कॅरम बॉलने सर्वांनाच बोल्ड केले”, अश्विनच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान मोदींचे भावनिक पत्र

रोहितने आक्रमक शैलीतच खेळावे शास्त्री

● रोहित शर्मा धावांसाठी झगडत असला, तरी ऑस्ट्रेलिया त्याला कमी लेखण्याची चूक करणार नाही. रोहितने द्विधा मन:स्थितीत राहू नये. त्याने आक्रमक शैलीतच खेळावे, असा सल्ला भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिला आहे.

● बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी सुरू असलेल्या मालिकेत सहाव्या क्रमांकावर खेळताना रोहितला तीन डावांत अनुक्रमे १०, ३ आणि ६ धावाच करता आल्या आहेत.

● ‘‘रोहितने योजनेत बदल केला पाहिजे असे मला वाटते. तो सहाव्या क्रमांकावर खेळताना अतिशय घातक ठरू शकतो. मात्र, त्याने सकारात्मक मानसिकता राखली, तरच ते शक्य आहे. आक्रमक खेळ करावा की बचावाला प्राधान्य द्यावे, अशा द्विधा मन:स्थितीत रोहितने राहू नये. त्याने आक्रमक शैलीतच खेळले पाहिजे. त्याने सुरुवातीची १०-१५ मिनिटे खेळून काढली, तर त्याला रोखणे अवघड जाईल,’’ असे शास्त्री म्हणाले.

Story img Loader