आज बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी टी-२० क्रमवारीत भारताचा केएल राहुल फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर घसरला आहे. विराट कोहली पूर्वीप्रमाणेच आठव्या स्थानावर कायम आहे. टी-२० विश्वचषकात भारताच्या शेवटच्या तीन सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या राहुलचे ७२७ गुण आहेत आणि तो एका स्थानाने खाली घसरला आहे. भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त झालेल्या राहुलने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध अनुक्रमे ६९, ५० आणि नाबाद ५४ धावा केल्या. भारत या स्पर्धेच्या सुपर-१२ टप्प्यातूनच बाद झाला.

भारतीय टी-२० संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मालाही नुकसान सहन करावे लागले आहे. रोहित १६व्या स्थानावर घसरला आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर टी-२० कर्णधारपद सोडणारा कोहली ६९८ गुणांसह आठव्या स्थानावर कायम आहे. टी-२० क्रमवारीत भारताकडून फक्त राहुल आणि कोहली अव्वल १० मध्ये आहेत. इतर खेळाडूंमध्ये, ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांनीही त्यांच्या संघाच्या पहिल्या टी-२० विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर क्रमवारीत लक्षणीय सुधारणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात नाबाद ७७ धावांची खेळी करणारा मार्श सहा स्थानांनी पुढे सरसावला असून तो संयुक्त १३व्या स्थानावर आहे, तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडलेला वॉर्नर आठ स्थानांनी प्रगती करत ३३व्या स्थानावर आहे.

हेही वाचा – IND vs NZ : आधी कॅप्टन आणि आता ‘प्रमुख’ गोलंदाज बाहेर..! पहिल्या टी-२० सामन्याच्या काही तासांपूर्वी…

अंतिम सामन्यात ८५ धावा करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ३२व्या स्थानावर आहे, तर डेव्हॉन कॉन्वे चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अॅडम झम्पा दोन स्थानांनी प्रगती करत तिसऱ्या स्थानावर, तर वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दोन स्थानांनी प्रगती करत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने सात स्थानांची झेप घेत १४व्या स्थानावर पोहोचले आहे.

श्रीलंकेचा लेगस्पिनर वनिंदू हसरंगा गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर कायम आहे. टॉप-१० गोलंदाजांच्या यादीत एकही भारतीय गोलंदाज नाही. जसप्रीत बुमराह १५व्या स्थानावर आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत सात स्थानांनी प्रगती केली आहे.

Story img Loader