पीटीआय, सिडनी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसोटी क्रिकेटमध्ये धावांसाठी धडपडत राहिल्यानंतरही पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय स्पर्धेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा भारतीय संघातील समावेश निश्चित मानला जात आहे. त्याच वेळी केएल राहुल, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांच्या समावेशाबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी १३ जानेवारी ही संघ पाठविण्याची अंतिम मुदत असून, त्यापूर्वी दोन दिवस आधी शनिवारी भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सदस्य राहिल्यानंतरही राहुल, शमी आणि जडेजाच्या समावेशाविषयी खात्री नाही. त्यामुळे महत्त्वाच्या स्पर्धेत एकाचवेळी सर्व अनुभवी खेळाडूंना बाहेर ठेवणे परवडणारे नाही या निकषाच्या आधारे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे संघातील स्थान कायम राहू शकते.

हेही वाचा >>>धोनीला केलं रनआऊट अन् टीम इंडियाच्या वर्ल्डकप विजयाचा हिरावला घास; किवी संघाच्या ‘त्या’ खेळाडूची अचानक निवृत्ती

विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्यानंतर भारताने केवळ सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. यावेळी शमी आणि जडेजा यांना विश्रांती देण्यात आली होती. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी मात्र राहुलचा समावेश करण्यात आला होता. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत मधल्या षटकांत डावाला वेग देण्यात राहुलला अपयश आल्याने त्याला मालिकेच्या मध्यात वगळण्यात आले होते. दुसऱ्या बाजूने सूर्यकुमार यादवलादेखील वगळण्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यशस्वी होत असला, तरी एकदिवसीय प्रारूपात त्याला अलीकडे फारसे यश मिळालेले नाही. त्यामुळे रोहित, विराट संघात असताना सूर्यकुमारला वगळून यशस्वी जैस्वालला संघात स्थान मिळू शकते. ऑस्ट्रेलियातील कामगिरीने यशस्वीचा संघात समावेश होणार यात शंका नाही.

यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंतला पहिली पसंती मिळाल्यास राहुलची पर्यायी यष्टिरक्षक म्हणून राहण्याची तयारी असल्यास त्याचा विचार होऊ शकतो. निव्वळ फलंदाज म्हणून राहुलला संधी मिळणार नाही. इशान किशनचे नाव चर्चेतही येण्याची शक्यता खूप कमी आहे. संघ निवडीत प्रशिक्षकाचा आग्रह लक्षात घेतला, तर गंभीर यांचे मत संजू सॅमसनच्या पारड्यात पडू शकते.

पर्यायांचा विचार

जडेजाला वगळले जाणार असे निश्चित समजले जात असून, त्याची जागा अक्षर पटेलला मिळेल. ऑफस्पिनर म्हणून वॉशिंग्टन सुंदर स्थान घेईल. कुलदीप यादव तंदुरुस्त नसल्यास निवड समिती रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती यांच्यापैकी एकाचा विचार करू शकते. अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्या संघात असताना नितीश कुमार रेड्डीचा विचार होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शमीबाबत तंदुरुस्तीचा प्रश्न आहे. जर, जसप्रीत बुमरा पाठीच्या दुखापतीने खेळू शकला नाही, तरच शमीच्या नावाचा विचार होऊ शकतो. फलंदाजीसाठी राखीव खेळाडूंत रिंकू सिंह, तिलक वर्मा हे पर्याय असतील.

हेही वाचा >>>Champions Trophy: पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीची हौस भारी; पण स्टेडियम्स बांधून तयारच नाही, यजमानपद दुबईकडे जाण्याची शक्यता

संभाव्य संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती/रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमरा (दुखापतीच्या स्वरूपावर अवलंबून), मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, आवेश खान/मोहम्मद शमी, रिंकू सिंह, तिलक वर्मा (अनपेक्षित निर्णय झाल्यास नितीश कुमार रेड्डी)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma and virat kohli included in india squad for champions trophy odis amy