Rohit-Virat Likely To Play Duleep Trophy: भारतीय संघ काही दिवसांपूर्वी श्रीलंका दौऱ्यावर होता, जिथे संघाला वनडे मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता संघ विश्रांती घेत असून बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समिती दुलीप ट्रॉफीसाठी संघ निवडणार आहे. बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका पाहता सर्व खेळाडू दुलीप ट्रॉफीसाठी उपलब्ध असावेत, अशी वरिष्ठ निवड समितीची इच्छा आहे. हा सीझन नव्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे.
शुबमन गिल, केएल राहुल, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव यांना दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्यास सांगण्यात आल्याचे इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे. मात्र, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दीर्घ विश्रांती देण्यात आल्याने तो ही स्पर्धा खेळणार नाही. बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या निवडीबाबतही निवड समिती चर्चा करणार आहे.
रोहित-विराट दुलीप ट्रॉफी खेळणार
भारतीय क्रिकेट संघाला पुढील चार महिन्यांत ऑस्ट्रेलियात ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसह एकूण १० कसोटी सामने खेळायचे आहेत. बांगलादेश मालिकेतील खेळपट्ट्या फिरकीपटूंना अनुकूल असतील अशी अपेक्षा आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुमराहला बांगलादेश मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. दुलीप ट्रॉफी पूर्वीसारखी विभागीय स्वरूपात होणार नाही. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारत अ, भारत ब, भारत क आणि भारत ड अशा चार संघांची निवड करेल.
दुलीप ट्रॉफी आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे खेळवली जाणार आहे. हे ठिकाण हवाई वाहतुकीशी जोडलेले नसल्यामुळे आणि स्टार खेळाडू येण्यास सहमती देत असल्याने, बीसीसीआय आता बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर एक फेरी आयोजित करण्याची योजना आखत आहेत. दुलीप ट्रॉफीचे सहा सामने ५ सप्टेंबरपासून सुरू होतील आणि २४ सप्टेंबरला संपतील. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी १९ सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवली जाणार आहे.
रोहित शर्मा व विराट कोहली दुलीप ट्रॉफीचा कोणता सामना खेळणार?
रोहित आणि कोहली दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात ५ सप्टेंबरला खेळणार की १२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या फेरीत हे स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कसोटी मालिकेपूर्वी बीसीसीआय चेन्नईत एक छोटे शिबिरही आयोजित करणार आहे, असे झाल्यास हे सर्व खेळाडू दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत खेळतील.
जय शाहांचे देशांतर्गत क्रिकेटवर वक्तव्य
काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले होते की, रोहित, कोहली आणि बुमराह यांसारख्या अव्वल भारतीय क्रिकेटपटूंना वगळून भारतीय संघातील सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटसाठी स्वत:ला उपलब्ध करून द्यावे लागेल. १५ ऑगस्टपासून तामिळनाडूमध्ये खेळल्या जाणाऱ्या बुची बाबू स्पर्धेत सूर्यकुमार आणि सरफराज खानसारखे खेळाडू सहभागी होणार आहेत.
ईशान-अय्यरला मिळणार संधी
दुलीप ट्रॉफीसाठी निवड समिती इशान किशनची निवड करू शकते. भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी किशनने लाल चेंडू क्रिकेट खेळावे, अशी निवड समितीची इच्छा असल्याची माहिती मिळाली आहे. ईशान आणि श्रेयस अय्यर यांना बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आले आहे. निवड समितीच्या सल्ल्यानंतरही ते गेल्या मोसमात रणजी ट्रॉफी खेळले नव्हते. दोन रणजी ट्रॉफी सामने खेळूनही अय्यरला करारातून मुक्त करण्यात आले, तर ईशान किशनने बीसीसीआयच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आणि वडोदरात स्वतंत्रपणे प्रशिक्षण घेतले. श्रीलंकेत नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान अय्यरने राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आणि किशनला पुनरागमन करण्याची आणखी एक संधी देण्यात आली आहे.
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना दुलीप ट्रॉफी संघात स्थान मिळणार नाही, कारण निवड समितीने या दोन दिग्गजांशिवाय पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. रहाणेच्या नेतृत्त्वाखाली गेल्या मोसमात मुंबई रणजी करंडक संघाने ४२वे रणजी विजेतेपद पटकावले होते, परंतु फलंदाजीत त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. पुजाराने धावा केल्या, पण सर्फराज, ध्रुव जुरेल या युवा खेळाडूंनी त्याची जागा भरून काढण्याची मोठी क्षमता दाखवली आहे, असे निवड समितीला वाटते.