Rohit-Virat To Create Record Against Pakistan: भारतीय संघ आगामी आशिया चषक २०२३ मध्ये पहिला सामना २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीवर नक्कीच सर्वांच्या नजरा असतील. आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध वनडे फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी केलेली पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर आता रोहित आणि विराटची जोडी एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्यापासून फक्त २ पावले दूर आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने मिळून भारतीय संघाला आतापर्यंतचे सामने जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आतापर्यंत ८५ एकदिवसीय सामने खेळताना दोघांनी मिळून ६२.४७ च्या सरासरीने ४९९८ धावा केल्या आहेत. रोहित आणि विराटमध्ये १८ शतके आणि १५ अर्धशतकांची भागीदारी पाहायला मिळाली. आता दोघेही ५००० धावांचा आकडा पूर्ण करण्यापासून फक्त २ पावले दूर आहेत.
टीम इंडियासाठी आतापर्यंत केवळ २ जोड्या वनडे फॉरमॅटमध्ये ५००० धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही सर्वाधिक धावा करणाऱ्या जोडी आहे, ज्यांनी मिळून एकूण ८२२७ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, दुसऱ्या क्रमांकावर शिखर धवन आणि रोहित शर्माची जोडी आहे, ज्यांनी मिळून ५१९३ धावा केल्या आहेत. जर रोहित आणि विराट पाकिस्तानविरुद्ध ही कामगिरी करण्यात यशस्वी ठरले, तर ते या टप्प्यावर पोहोचणारी सर्वात वेगवान जोडी ठरेल.
हेही वाचा – UPL 2023; ६,६,६…सुपर ओव्हरमध्ये रिंकू सिंगचा कहर, षटकारांची बरसात करुन संघाला मिळवून दिला रोमहर्षक विजय
रोहित शर्मा वनडेत १० हजार धावा पूर्ण करण्याच्या जवळ –
भारतीय कर्णधार रोहित शर्मा वनडे फॉरमॅटमध्ये १०,००० धावा पूर्ण करण्यापासून फक्त १६३ धावा दूर आहे. हा टप्पा गाठणारा रोहित हा दुसरा वेगवान फलंदाज ठरू शकतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०,००० धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, जो त्याने २०५ डावांमध्ये पूर्ण केला. रोहितने आतापर्यंत २३७ डावात ९८३७ धावा केल्या आहेत.