Rohit Sharma Virat Kohli Test Retirement: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाचे दोन्ही वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा पूर्णपणे फ्लॉप ठरले. ज्याचा फटका संघाला सातत्याने बसताना दिसत आहे. विराट कोहलीने पर्थ कसोटीत शतक झळकावले पण रोहित शर्मा चारही सामन्यात फेल ठरला. रोहित शर्मा आणि विराट कोहली फ्लॉप झाल्यानंतर, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या दोघांच्या निवृत्तीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने भारताला ३४० धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर म्हणून टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली आणि डावाच्या १७व्या षटकातच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने रोहित शर्मा (९) आणि केएल राहुल (०) यांच्या रूपाने मोठी विकेट घेतली. त्यामुळे टीम इंडियाने अवघ्या २५ धावांत दोन विकेट गमावल्या.
हेही वाचा – IND Vs AUS: रोहित शर्माला बाद करत पॅट कमिन्सने केला विश्वविक्रम, कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच कर्णधार
यानंतर विराट कोहलीवर सर्व जबाबदारी होती पण तोही काही विशेष करू शकला नाही आणि मिचेल स्टार्कचा बळी ठरला. कोहलीला केवळ पाच धावा करता आल्या आणि ३३ धावांच्या स्कोअरवर भारताला तिसरा धक्का बसला. यानंतर विराट कोहली खेळत राहील, पण रोहित शर्माला आता मोठा निर्णय घ्यावा लागेल, असा विश्वास रवी शास्त्री यांनी व्यक्त केला.
रवी शास्त्री यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीच्या चर्चेवर मेलबर्न कसोटीतील पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रानंतर वक्तव्य करत म्हणाले, “माझ्या मते विराट कोहली आणखी काही काळ खेळताना दिसेल. तो आज कसा बाद झाला, याने काही फरक पडत नाही. माझ्या मते तो पुढील तीन-चार वर्षे खेळताना दिसेल. रोहित शर्मा बद्दल बोलायचं तर, तो निर्णय घेऊ शकतो. टॉप ऑर्डरमध्ये त्याचं फूटवर्क आता पूर्वीसारखे राहिलेलं नाही. चेंडूपर्यंत पोहोचण्यात त्याला विलंब होतोय. त्यामुळे या मालिकेत काय करायचं हा सर्वस्वी त्याचा निर्णय असणार आहे.”
हेही वाचा – IND vs AUS: जसप्रीत बुमराहने घडवला इतिहास, दिग्गजांना मागे टाकत ठरला जगातील नंबर वन गोलंदाज
ऑस्ट्रेलियामध्ये रोहितने आतापर्यंत केवळ ३, ६, १०, ३ आणि ९ धावा केल्या आहेत. तर गेल्या १५ कसोटी डावांमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त एकच अर्धशतक आले आहे. ३७ वर्षांचा भारतीय कर्णधार रोहित शर्मा आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. जर तो शेवटचा सिडनी कसोटी सामना खेळला तर त्यानंतरही तो निवृत्तीची घोषणा करू शकतो. या मालिकेच्या मध्यातच आर. अश्विन आधीच निवृत्त होऊन मायदेशी परतला आहे.