Rohit Sharma said Team’s words will not come out: भारतीय क्रिकेट संघाने गेल्या काही वर्षांत अनेक चढउतार पाहिले आहेत. त्यामुळे या सगळ्या काळात सर्वाधिक चर्चेचा विषय होता, तो अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म. विशेष म्हणजे कोहली हा या पिढीतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. परंतु मागील सुमारे दोन-तीन वर्षे कोहलीला खराब फॉर्मचा सामना करावा लागला हेही खरे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही वर्षात परदेशात विराट कोहलीच्या फॉर्मबाबत वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नांना कंटाळलेल्या भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, बाहेरच्या आवाजाचा संघावर परिणाम होत नाही. माजी कर्णधार कोहलीने पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध अनिर्णित राहिलेल्या दुसऱ्या कसोटीत शतक झळकावले. या फॉरमॅटमध्ये त्याने पाच वर्षांनंतर परदेशात शतक झळकावले आहे.

कोहलीला मोठी खेळी खेळता न आल्याने चिंता होती का? असे एका पत्रकाराने विचारले असता रोहित म्हणाला की संघ बाहेरील गोष्टींकडे लक्ष देत नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत तो म्हणाला, “मी या प्रश्नाचे उत्तर अनेकदा दिले आहे. कोणी किती धावा काढल्या, किती विकेट घेतल्या, या सगळ्या बाहेरील गोष्टी आहेत. जे लोक असे बोलतात त्यांना संघात काय होते ते माहित नसते.”

हेही वाचा – WWE: ६९ वर्षीय हल्क होगन तिसऱ्यांदा करणार लग्न, २४ वर्षांनी लहान असलेल्या योगा टीचरशी केली एंगेजमेंट

आम्हाला संघाच्या गोष्टी आत ठेवायच्या आहेत –

रोहित शर्मा म्हणाला, “संघात जे घडते ते आतच राहते. आम्हाला तेच हवे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅच आणि सीरिज जिंकणं आहे. त्यामुळे कोण काय म्हणतंय? आम्हाला त्याची पर्वा नाही. सध्या एकदिवसीय मालिका जिंकण्याला प्राधान्य आहे. मी अनेकदा सांगितले आहे की आम्हाला संघाच्या गोष्टी आत ठेवायच्या आहेत आणि भविष्यातही तेच सांगेन.”

कोहलीने शतकाचा दुष्काळ संपवला –

कोहलीने डिसेंबर २०१८ मध्ये परदेशात शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर आता पोर्ट ऑफ स्पेन येथील ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आपले ७६ वे शतक झळकावले. डॉमिनिका येथील पहिल्या कसोटीत कोहली ७६ धावांवर बाद झाला होता. वेस्ट इंडिज विरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला २७ जुलैपासून सुरुवात होणार आहे. यादरम्यान कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शतकाच्या विक्रमाच्या जवळ जाण्याची संधी असेल. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनची ४९ शतके आहेत. कोहलीच्या नावावर ४६ शतके आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma angry on the question regarding virat kohlis form said teams words will not come out vbm