विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यात सर्वोत्तम कामगिरी केली. टी-२० पाठोपाठ वन-डे आणि कसोटी मालिकेतही भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मात्र कसोटी मालिकेत सलामीवीर लोकेश राहुलचं अपयश हा चर्चेचा विषय ठरला. सौरव गांगुलीसह अनेक माजी खेळाडूंनी लोकेश राहुलच्या खेळीवर टीका करत, रोहित शर्माला कसोटी संघात सलामीला संधी देण्याची मागणी केली आहे. मात्र भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी रोहितला कसोटी संघात सलामीला पाठवण्याचा निर्णय घाईचा ठरु शकेल असं मत व्यक्त केलं आहे.

अवश्य वाचा – धोनीला सन्मानाने निवृत्ती मिळायला हवी – अनिल कुंबळे

“लोकेश राहुल सध्या विचीत्र परिस्थितीत अडकला आहे. तो संघाला चांगली सुरुवात करुन देतो आहे, मात्र त्याला मोठी खेळी करता येत नाहीये, तो लगेचच बाद होतो. विंडीजविरुद्ध अखेरच्या कसोटीतही फलंदाजीदरम्यान तो चाचपडताना दिसला.” CricketNext या संकेतस्थळाशी बोलत असताना कुंबळे यांनी आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – रविचंद्रन आश्विन अजुनही भारताचा सर्वोत्तम फिरकीपटू !

सौरव गांगुलीने आपल्या कर्णधारपदाच्या काळात विरेंद्र सेहवागला कसोटीत सलामीला येण्याची संधी दिली, त्याचप्रमाणे रोहितला संधी द्यावी का? या प्रश्नावर बोलताना कुंबळे म्हणाले,”ज्यावेळी प्रत्यक्षात असा निर्णय घेण्यात येईल तेव्हाच याविषयी बोलता येईल. मात्र रोहितला कसोटी संघात सलामीला संधी द्यावी अशी वेळ आली आहे, असं मला वाटत नाही. सलामीच्या जागेसाठी आपल्याला पर्याय शोधणं गरजेचं आहे, यात काहीच वाद नाही. मात्र यासाठी स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला संधी द्यावी की रोहितला यावर विचार व्हायला हवा. रोहित शर्मा चांगला फलंदाज आहे कसोटी संघात त्याला राखीव खेळाडू म्हणून बाहेर बसावं लागतं, मात्र सलामीला संधी देण्याबाबत घाईमध्ये निर्णय घेता येणार नाही.”

अवश्य वाचा – धोनी माझा मार्गदर्शक, त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो – ऋषभ पंत

Story img Loader