‘हिटमॅन’ रोहित शर्माला भारतीय कसोटी संघात सलामीवीराची जागा मिळण्याची शक्यता आहे. निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. गेल्या काही सामन्यांमध्ये सलामीवीर लोकेश राहुलचं अपयश हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. अनेक माजी खेळाडूंनी राहुलच्या जागी रोहितला संधी देण्याची मागणी केली होती. भारताने नवीन फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनीही कसोटी संघात सलामीची जोडी हा चिंतेचा विषय असल्याचं मान्य केलं होतं.

“विंडीज दौऱ्यानंतर निवड समितीचे सदस्यांची बैठक झालेली नाहीये. ज्यावेळी आम्ही एकत्र येऊ तेव्हा रोहित शर्माच्या पर्यायाचा जरुर विचार केला जाईल. लोकेश राहुल गुणवान खेळाडू आहे, मात्र सध्या तो खडतर काळातून जातोय. त्याच्या फलंदाजीचा ढासळता फॉर्म हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्याला खेळपट्टीवर अधिक वेळ घालवणं गरजेचं आहे, तो लवकरच आपल्या फॉर्मात परतेल अशी आम्हाला आशा आहे.” India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एम.एस.के. प्रसाद बोलत होते.

वेस्ट इंडिज दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत लोकेश राहुलने १३, ६, ४४ आणि ३८ अशा धावा काढल्या होत्या. याचसोबत याआधीच्या कसोटी मालिकांमध्येही लोकेश राहुलची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी राहिलेली नाहीये. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत रोहित शर्माला सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader