Rohit Sharma Batting Loophole In IPL 2024: मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने आयपीएल २०२४ च्या सुरुवातीला दमदार खेळ दाखवला असला तरी त्याचा एकूण फॉर्म कुठेतरी बिनसल्याचे दिसतेय. गेल्या महिन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याने एक शतक झळकावले, पण शतकानंतर त्याच्या धावसंख्येत लक्षणीय घट झाली. खरं तर, त्याच्या शेवटच्या तीन डावांमध्ये, रोहितला दुहेरी आकडा पार करण्यातही अपयश आले आहे, ज्यामुळे T20 विश्वचषकापूर्वी भारतीय कर्णधाराच्या फॉर्मबद्दल काही चिंता निर्माण झाल्या आहेत.
रोहित बाद होण्याचा एकच पॅटर्न
या आयपीएलमध्ये रोहितच्या बाद होण्याचा एकच पॅटर्न राहिला आहे, तो म्हणजे डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्धचा त्याचा संघर्ष. या आयपीएलमध्ये रोहित पाच वेळा डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांसमोर बाद झाला आहे. (ट्रेंट बोल्टविरुद्ध दोनदा, सॅम कुरन, खलील अहमद आणि मोहसीन खान यांच्याविरुद्ध प्रत्येकी एकदा).
चिंताजनक बाब म्हणजे डावखुऱ्या खेळाडूंविरुद्ध भारतीय कर्णधाराचा संघर्ष नवीन नाही, परिणामी टी २० विश्वचषकापूर्वी हा पॅटर्न मोडण्याचा मार्ग रोहितला गवसणार का ही चिंता अगदी योग्य आहे. भारताला टी २० विश्वचषकाच्या गट टप्यातील सामन्यात पाकिस्तानचा सामना करायचा आहे. या संघातील शाहीन आफ्रिदी हा सर्वात यशस्वी गोलंदाज सुद्धा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे, तर अन्य संघांमध्ये सुद्धा अनेक दर्जेदार डावखुरे गोलंदाज आहेत जे आयपीएलपासूनच रोहितच्या खेळाचे निरीक्षण करत असणार.
…ज्यामुळे रोहित शर्माला फलंदाजी करणे अधिक कठीण होते!
भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने शुक्रवारी रात्री होणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्याआधी रोहितच्या फलंदाजीमधील ‘लूपहोल’बद्दल सविस्तरपणे खुलासा केला आहे. जाफरने ESPNCricinfo शी बोलताना सांगितले की, “त्याला डाव्या हाताच्या फिरकीपटूंविरुद्ध खेळताना अडथळा येतो, तो ज्या प्रकारे पाय पुढे करतो त्यानुसार त्याला बाद करण्याची रणनीती आखली जाते. उजव्या हाताच्या गोलंदाजांनीही त्याला बाद करण्याचा मार्ग शोधला आहे. पण डावखुरे एक कोन तयार करतात ज्यामुळे त्याला फलंदाजी करणे अधिक कठीण होते. ही चूक नक्कीच रोहितच्या लक्षात आली आहे तो ही त्यांचा सामना करण्याचा मार्ग शोधतोय, काहीवेळा तो स्विंग टाळण्यासाठी गोलंदाजाच्या दिशेने पुढे येताना दिसतो. “
रोहित शर्माने थोडा वेळ द्यायला हवा
“ट्रेंट बोल्टने त्याला अवे-स्विंगर गोलंदाजीने जेव्हा बाद केलं तेव्हा रोहितला तसा चेंडू अपेक्षित नव्हता. त्याने खलीलविरुद्ध सुद्धा तशीच चूक केली अर्थात ती विकेट नीट नियोजन करून घेतलेली नव्हती पण यातून एक अंदाज येतो की रोहितला बाद करण्यासाठी त्याच्याच खेळात एक लूपहोल आहे जी त्याला माहित आहे, तो सुद्धा हुशार आहे, तो अशा विकेट्स वारंवार दिल्या जाणार नाहीत यासाठी नक्कीच काम करत असणार. त्याने आणखी थोडा वेळ द्यायला हवा. खेळताना सुद्धा तो त्याच्या डावात खूप लवकर चेंडूला स्नायूंची शक्ती लावायला जातो, जरा स्थिर होण्यासाठी दोन षटकांचा वेळ घ्यायला हवा”
हे ही वाचा<< युजवेंद्र चहलची ‘या’ भारतीय खेळाडूविरुद्ध कॉपीराईट तक्रार; पुराव्यासहित केली पोस्ट; चाहत्यांचा ‘युझी’ला पाठिंबा, पाहा
रोहितने यंदाच्या १० आयपीएल सामन्यांमध्ये १५८.२९ च्या स्ट्राइक रेटने ३१५ धावा केल्या आहेत.