Rohit Sharma sets record against Shaheen Afridi: पाकिस्तान विरुद्धच्या सुपर फोरच्या आपल्या पहिल्या सामन्यात, भारतीय सलामीवीर फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माने शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच षटकात षटकार मारून एक आश्चर्यकारक कामगिरी केली, जी वनडे क्रिकेटमध्ये यापूर्वी कोणीही केली नव्हती. सुपर फोर सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला आले तर शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानकडून पहिले षटक टाकले.
रोहित शर्मा ठरला जगातील पहिला फलंदाज –
पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाच्या वतीने रोहित शर्माने स्ट्राइक घेतली, तर पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने गोलंदाजीसाठी चेंडू शाहीन आफ्रिदीकडे दिला. पहिल्याच षटकात रोहित शर्मा आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात अतिशय रंजक लढत झाली आणि शाहीनने पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. यानंतर या षटकातील पुढील चार चेंडूंवर शाहीन आफ्रिदीने रोहित शर्मावर वर्चस्व गाजवले आणि हिटमॅनला एकही धाव काढता आली नाही.
म्हणजेच पहिल्या पाच चेंडूंवर रोहित शर्मा आपले खाते उघडू शकला नाही, पण त्यानंतर पहिल्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर त्याने उत्कृष्ट षटकार ठोकला आणि षटकाराने आपले खाते उघडले. या षटकाराच्या जोरावर रोहित शर्मा मोठा विक्रम केला. शाहीन आफ्रिदीविरुद्धच्या वनडे सामन्यातील पहिल्याच षटकात षटकार मारणारा रोहित शर्मा जगातील पहिला फलंदाज ठरला.
हेही वाचा – IND vs PAK: शुबमन गिलचा झेल सोडणे पाकिस्तान संघाला पडले महागात, VIDEO होतोय व्हायरल
रोहित शर्मा ५६ धावा करून झाला बाद –
१२१ धावांवर भारतीय संघाची पहिली विकेट पडली. कर्णधार रोहित शर्मा ४९ चेंडूत ५६ धावा करून बाद झाला. शादाब खानने त्याला फहीम अश्रफकडे झेलबाद केले. रोहितने आपल्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार मारले. रोहित शर्मानंतर शुबमन गिलही बाद झाला आहे. शाहीन आफ्रिदीने त्याला आगा सलमानकरवी झेलबाद केले. गिलने ५२ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. आता विराट कोहलीसोबत लोकेश राहुल क्रीजवर आहे. १८ षटकांनंतर भारताची धावसंख्या २ बाद १२४ आहे.