India vs Afghanistan 1st T20I Match Updates : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ६ विकेट्सनी सहज विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयाबरोबरच या मालिकेत भारताच्या कर्णधाराची भूमिका बजावणाऱ्या रोहित शर्माच्या नावावर एका विशेष कामगिरीची नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० टी-२० विजयांचा आकडा पूर्ण करणारा तो पुरुष खेळाडूंमध्ये पहिला खेळाडू ठरला आहे. या फॉरमॅटमध्ये एक खेळाडू म्हणून त्याच्या नावावर याआधीच सर्वाधिक विजयांचा विक्रम होता, तर आता आणखी एक खास कामगिरी त्याच्या नावावर झाली आहे.
रोहित शर्माचे टी-२० सामन्यांच्या विजयांचे शतक –
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळाडू म्हणून १०० सामने जिंकणारा रोहित शर्मा पहिला खेळाडू ठरला आहे. २००७ मध्ये पदार्पण करणाऱ्या रोहितचा हा १४९ वा टी-२० सामना होता. १०० विजयांचा टप्पा गाठणारा तो एकमेव खेळाडू आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. रोहित शर्मा टी-२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाल्यापासून भारताकडून सर्वात लहान फॉरमॅटमध्ये खेळत नव्हता, परंतु त्याने परतताच एक मोठी कामगिरी आपल्या नावावर नोंदवली.
पुरुष खेळाडूंमध्ये पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक (८६) दुसऱ्या क्रमांकावर आणि भारताचा विराट कोहली (७३) सर्वाधिक टी-२० सामने जिंकण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद हाफीज आणि अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी संयुक्त चौथ्या स्थानावर आहेत. या दोघांच्या नावावर ७०-७० विजय आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल ६८ विजयांसह पाचव्या स्थानावर आहे.
सर्वाधिक टी-२० सामने जिंकण्याचा विक्रम डॅनियल व्याटच्या नावावर –
जर आपण पुरुष आणि महिला खेळाडूंच्या एकूण यादीवर नजर टाकली, तर सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा विक्रम इंग्लंडच्या अनुभवी डॅनियल व्याटच्या नावावर आहे. तिने आतापर्यंत इंग्लिश संघाच्या १११ विजयात संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलिसा हिली आणि अष्टपैलू अॅलिसा पेरी यांच्या नावावर १००-१०० विजय आहेत. आता रोहित शर्माने या दोघींच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
भारताने अफगाणिस्तानवर सहज विजय मिळवला –
शिवम दुबेच्या (नाबाद ६०) अर्धशतकाच्या जोरावर तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला. भारताने अफगाणिस्तानचा ६ गडी आणि १५ चेंडू राखून पराभव केला. यासह त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.अनुभवी मोहम्मद नबी आणि युवा अजमतुल्ला ओमरझाई यांच्यात ४३ चेंडूत ६८ धावांच्या भागीदारीमुळे अफगाणिस्तानने पाच गडी गमावून १५८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने १७.३ षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले.