IND vs AUS 4th Test Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्माला भलेही मोठी खेळी करता आली नसली, तरी ३५ धावांच्या या खेळीच्या जोरावर त्याने दोन मोठी कामगिरी केली आहे. रोहितने सर्वात जलद २००० धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजाराची बरोबरी केली आहे. याशिवाय त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७ हजार धावाही पूर्ण केल्या आहेत.
रोहित सर्वात जलद २००० धावा करणारा दुसरा खेळाडू –
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन घरच्या मैदानावर सर्वात जलद २००० कसोटी धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने अवघ्या ३३ डावात ही कामगिरी केली, तर रोहित शर्माने २००० कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी ३६ डाव घेतले. या बाबतीत त्याने चेतेश्वर पुजाराची बरोबरी केली आहे.
रोहितने १७ हजार धावा पूर्ण केल्या –
भारतीय कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७,००० धावा पूर्ण केल्या आहेत. भारताकडून ही कामगिरी करणारा तो सातवा फलंदाज ठरला आहे. या सामन्यापूर्वी हा आकडा गाठण्यासाठी त्याला २१ धावांची गरज होती, जी त्याने सहज गाठली. आता रोहित शर्माच्या ४३८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १७,०१४ धावा आहेत. सक्रिय खेळाडूबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहलीनंतर तो दुसरा भारतीय खेळाडू आहे.
१७ हजार धावांच्या क्लबमध्ये सामील असलेले भारतीय खेळाडू-
सचिन तेंडुलकर ३४,३५७
विराट कोहली २५,०४७
राहुल द्रविड २४,२०८
सौरव गांगुली १८,५७५
एमएस धोनी १७,२६६
वीरेंद्र सेहवाग १७,२५३
रोहित शर्मा १७,०१४
हेही वाचा – IND vs AUS 4th Test: विराटने नॅथन लायनचा झेल घेताच केला मोठा विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
रोहितची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
जर आपण रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने ४९ कसोटी सामन्यांमध्ये ३३७९ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने ९ शतके आणि १४ अर्धशतके केली आहेत. त्याने कसोटीत एक द्विशतकही झळकावले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितच्या २४१ सामन्यांमध्ये ९७८२ धावा आहेत. रोहितने वनडेमध्ये ३० शतके आणि ४८ अर्धशतके केली आहेत. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर सर्वाधिक ३ द्विशतके आहेत. टी-२० क्रिकेटबद्दल बोलायचे झाले, तर त्याने १४८ सामन्यात ३८५३ धावा केल्या आहेत. टी-२० मध्ये त्याच्या नावावर ४ शतके आहेत.