Rohit Sharma Mumbai Indians: २००८ मध्ये आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेतल्या बहुचर्चित संघांमध्ये मुंबई इंडियन्सचा समावेश होता. या संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर होता. सचिनसह सनथ जयसूर्या, हरभजन सिंग, कायरेन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, दिनेश कार्तिक असे असंख्य नावाजलेले खेळाडू या संघात होते. नेतृत्वाची धुरा सचिनसह अनेकांनी सांभाळली पण मुंबई इंडियन्सला जेतेपदावर नाव कोरता आलं नाही. २०१३ हंगामाआधी मुंबई इंडियन्सने लिलावात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगला ताफ्यात समाविष्ट केलं. पॉन्टिंगचा अनुभव आणि जिंकण्यातलं सातत्य कामी येईल असं मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाला वाटलं होतं. पण तसं झालं नाही. कर्णधार आणि खेळाडू म्हणून लौकिकाला साजेशी कामगिरी होत नसल्याने पॉन्टिंगने हंगामाच्या मध्यातच कर्णधारपद सोडलं आणि संघातूनही स्वत:ला वगळलं.
आयसीसी रिव्ह्यू कार्यक्रमात बोलताना रिकी पॉन्टिंगने या बदलाविषयी सांगितलं होतं. “मी मुंबई इंडियन्सचा कर्णधार होईन या दृष्टिकोनातून मुंबई इंडियन्सने मला लिलावात खरेदी केलं. हंगाम सुरू झाला पण माझी कामगिरी लौकिकाला साजेशई होत नव्हती. संघातलं स्थान टिकेल असा मी खेळत नव्हतो. माझ्याऐवजी आणखी एका आंतरराष्ट्रीय खेळाडूला खेळायची संधी मिळू शकत होती. त्यामुळे मी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला”, असं पॉन्टिंगने सांगितलं.
“तुझ्याऐवजी नेतृत्वाची धुरा कोणाकडे सोपवावी असं संघमालक आणि व्यवस्थापनाने मला विचारलं. तेव्हा रोहित शर्मा लहान होता पण मी त्याचंच नाव सुचवलं. आमची बैठक झाली. त्यामध्ये अनेक नावांवर चर्चा झाली. पण मी रोहितच्या नावावर ठाम राहिलो. चर्चेअंती रोहितच्या नावावर शिक्कामोर्तब झालं”, असं पॉन्टिंगने सांगितलं.
२४ एप्रिल२०१३, स्थळ- इडन गार्डन्स
कोलकाताच्या प्रसिद्ध इडन गार्डन्स स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होता. सामन्यासाठी दोन्ही संघ मैदानात पोहोचले. सराव सुरू झाला. त्याचवेळी बातमी आली की रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार असेल. रिकी पॉन्टिंगने कर्णधारपद सोडलं होतं आणि अंतिम अकरातून स्वत:ला वगळलं. नाणेफेकीला मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा तर कोलकाता नाईट रायडर्सकडून गौतम गंभीर उपस्थित होते. रोहित नाणेफेक हरला पण कर्णधारपदाच्या पदार्पणातच त्याने संघाला जिंकून दिलं.
कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावांची मजल मारली. जॅक कॅलिस (३७), मनोज तिवारी (३३), आयोन मॉर्गन (३१) यांनी उपयुक्त खेळी केल्या. मुंबईकडून मिचेल जॉन्सन, लसिथ मलिंगा आणि प्रग्यान ओझा यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ड्वेन स्मिथच्या ६२ धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईने ५ विकेट्स राखून हे लक्ष्य गाठलं. नवनियुक्त कर्णधार रोहितने ३४ धावांची खेळी केली. कायरेन पोलार्डने ३३ धावा केल्या.
रिकी पॉन्टिंगने कर्णधारपद सोडलं त्यावेळी मुंबईच्या संघात सचिन तेंडुलकरचा समावेश होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सुरुवातीच्या हंगामांमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. त्यामुळे त्यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याची शक्यता कमी होती. सचिनव्यतिरिक्त हरभजन सिंग, कायरेन पोलार्ड, दिनेश कार्तिक हे खेळाडू होते. अनुभव आणि कर्तृत्व या दोन्ही आघाड्यांवर या तिघांनी स्वत:ला सिद्ध केलं होतं. पण मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने रोहितच्या नेतृत्वगुणांवर विश्वास ठेवला. रोहितने संघाचा विश्वास सार्थ ठरवताना मुंबईला ५ जेतेपदं जिंकून दिली.
डेक्कनने गमावलं, मुंबईने कमावलं
आयपीएल स्पर्धेत २००८ ते २०१० असे तीन हंगाम रोहित शर्मा डेक्कन चार्जर्स संघाचा भाग होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट डेक्कन चार्जर्स संघाचा भाग होता. गिलख्रिस्टने रोहितचं भरभरुन कौतुक केलं होतं. २००९ मध्ये डेक्कन चार्जर्स संघाने जेतेपदावर नाव कोरलं. रोहितने फलंदाज म्हणून छाप उमटवलीच पण त्यापल्याड जात गोलंदाजीतही चमक दाखवली. डेक्कन चार्जर्ससाठी खेळताना रोहितच्या नावावर हॅटट्रिकही आहे. डेक्कन चार्जर्स संघ निकाली निघाला. २०११ हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला आपल्याकडे वळवलं. दोनच वर्षात रोहित मुंबईचा कर्णधार झाला आणि संघाचं नशीबच पालटलं. स्पर्धेतील यशस्वी कर्णधारांमध्ये रोहितचं नाव घेतलं जातं.
मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याच्या रुपात नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. रोहित शर्मा हार्दिकच्या नेतृत्वात खेळणार का? यासंदर्भात मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने काहीही स्पष्ट केलेलं नाही. रोहित ३६ वर्षांचा आहे. तो भारताचा कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी२० प्रकारातला कर्णधार आहे. वय, जबाबदाऱ्या आणि दुखापती पाहता तो हळूहळू खेळणं कमी करेल अशी चिन्हं आहेत. तो नेमकी कोणती जबाबदारी सोडणार हे त्याने स्पष्ट केलेलं नाही. काही दिवसांपूर्वीच झालेल्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभव रोहितच्या जिव्हारी लागला होता. हा पराभव पचवणे सोपे नव्हते असं रोहितने स्पष्ट केलं. अवघ्या सहा महिन्यात ट्वेन्टी२० वर्ल्डकप होतो आहे. रोहित त्या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे. पण यासंदर्भात रोहितने स्वत: किंवा बीसीसीआयने अधिकृत काहीही स्पष्ट केलेलं नाही.