भारतीय संघाचा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात IPLमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात आले, पण धक्कादायकरित्या रोहित शर्माला वगळण्यात आलं. या निर्णयानंतर BCCI आणि निवड समितीवर टीकेची झोड उठली. अनेकांनी यासाठी विराट कोहलीला दोषी ठरवत अंतर्गत राजकारणाचा रंग दिला. पण शनिवारी BCCIने रोहित शर्माच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली.
“रोहितच्या दुखापतीबद्दल उद्या (रविवारी) माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतरच तो तंदुरूस्त आहे की अद्याप दुखापतग्रस्तच आहे याबाबत नक्की सांगता येईल. त्याला स्नायूंची दुखापत झाली आहे. अशा परिस्थितीत खरं आव्हान असतं मैदानावर एकेरी, दुहेरी धावा काढणं. उद्या यासंबंधीच्या सर्व गोष्टी पाहिल्या जातील. त्या आधारावर तो तंदुरूस्त आहे की त्याला आणखी विश्रांतीची गरज आहे याबाबतचा निर्णय घेतला जाईल”, असं BCCI (फंक्शनरी) कडून ANIशी बोलताना स्पष्ट करण्यात आलं.
रोहितच्या स्नायूंची दुखापत दुसऱ्या श्रेणीची आहे. अशा परिस्थितीत फलंदाजाला चालणं आणि नियमित फलंदाजी करणं शक्य असतं. पण खेळपट्टीवर धावा काढणं आणि फिल्डिंग करताना धावणं या गोष्टींवर बंधने येतात. सहसा एकेरी धाव घेऊन पटकन दुसऱ्या धावेसाठी वळताना स्नायूंवर ताण येतो आणि अशाप्रकारची दुखापत होते. जर तुम्ही दुखापतीतून पूर्ण सावरले असाल तर तुम्हाला धावण्यात समस्या उद्भवणार नाही”, असेही त्यांनी सांगितले.