IND vs PAK Asia Cup 2023: २०२३ च्या आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सलामीच्या सामन्यात रोहित शर्माने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेऊन चांगली सुरुवात केली होती. मात्र पावसाच्या आधी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने टीम इंडियाची खेळी खराब केली होती. शाहीनने या आधी सुद्धा २०२१ मध्ये टी २० विश्वचषकाच्या स्पर्धेत भारताची टॉप फलंदाजांच्या फळीला जेरीस आणले होते. तर यंदाच्या आशिया चषकात सुद्धा पहिल्याच सामन्याच्या तिसऱ्या चेंडूवर शाहीनने रोहित शर्माला बाद केले. विशेष म्हणजे त्याने याच सामन्यात विराट कोहलीला सुद्धा स्वस्तात माघारी पाठवले होते.
२०१९, २०२१ आणि आता २०२३ च्या सामन्यांनंतर आता रविवारी सुपर 4 मध्ये भारताचा त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांशी पुन्हा सामना होणार आहे. यावेळी साहजिकच रोहितवर पुन्हा एकदा दडपण असेल.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने रोहितच्या खेळावर विशेष टिपण्णी केली आहे. अख्तरने अलीकडेच भारत विरुद्ध पाकिस्तानच्या आगामी सामन्याच्या आधी स्टार स्पोर्ट्सवर दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, “शाहीनने रोहितच्या मनात भीती निर्माण केली आहे आणि म्हणूनच रोहित जेव्हा शाहीनचा सामना करतो तेव्हा त्याला त्याच्या सेट गेम प्लॅनमध्ये बदल करण्यास भाग पाडले जाते.”
“हा तो रोहित शर्मा नाहीच, हा जो खेळतोय तो त्याचा बॉडी डबल (तोतया) आहे, शाहीन त्याच्या डोक्यात असा काही बसलाय.. आजपर्यंत मी त्याला त्याची भूमिका बदलताना पाहिलं नाही पण शाहीन समोर नेमकं त्याचा प्लॅन बदलतो. शाहीन त्याच्या डोक्यात आहे. IND vs PAK सामन्याचे हेच दडपण खेळाडूंवर आहे.”
हे ही वाचा<< गौतम गंभीरने मधलं बोट दाखवण्यावर दिलेलं उत्तर खोटंच! भारतविरोधी घोषणांचा तो Video काय? हा पुरावा पाहा
दरम्यान, आशिया चषक सुपर 4 टप्प्यातील भारताच्या आशा स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या खांद्यावर आहेत. टीम इंडिया आता सुपर 4 टप्प्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध आमने सामने येणार आहेत. त्यानंतर गतविजेत्या श्रीलंका आणि बांगलादेश यांच्याशी भारताचा सामना होईल. मागील वर्षी, श्रीलंकेने स्पर्धेच्या टी २० मध्ये विजय मिळवला होता, तर सुपर 4 दरम्यान भारताला चॅम्पियन तसेच पाकिस्तानकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.