Rohit Sharma broke Sehwag Gavaskar’s record by playing 50 plus innings for the 102nd time: भारतीय कर्णधार रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावले. त्याने सलामीवीर यशस्वी जैस्वालसोबत पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून संघाला दमदार सुरुवात करून दिली. या अर्धशतकी खेळीनंतर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय सलामीवीर फलंदाज म्हणून मोठा विक्रमही नोंदवताना वीरेंद्र सेहवाग आणि सुनील गावस्कर यांचे विक्रम मोडले आहेत.
रोहित शर्माने सेहवाग आणि गावस्कर यांना मागे टाकले –
रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या डावात १०६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने २०२३-२५ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची जबरदस्त सुरुवात केली. त्याचबरोबर या खेळीनंतर त्याने भारताचे माजी सलामीवीर सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांचेही विक्रम मोडीत काढले. त्याचबरोबर रोहित शर्माने ३५०० धावांचा टप्पा पार केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने ही १०२व्यांदा ५० प्लसची इनिंग खेळली आहे. याआधी सुनील गावस्कर आणि सेहवाग यांनी भारताकडून सलामीवीर फलंदाज म्हणून १०१ वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० प्लस इनिंग्स खेळल्या होत्या. आता रोहित शर्मा या दोघांच्याही पुढे गेला आहे.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ५० प्लस इनिंग्स खेळण्याच्या बाबतीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तसेच गावस्कर आणि सेहवाग संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. या बाबतीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२० वेळा ५० प्लस इनिंग्स खेळल्या आहेत. या सामन्यात रोहित शर्माने आतापर्यंत ६८ धावांवर नाबाद आहे.
आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून भारतासाठी सर्वाधिक ५०पेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज –
१. सचिन तेंडुलकर – १२० वेळा
२. रोहित शर्मा – १०२ वेळा
३. सुनील गावस्कर/वीरेंद्र सेहवाग – १०१ वेळा
हेही वाचा – IND vs WI: यशस्वी जैस्वालने झळकावले कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक, रोहित शर्मासह साकारली शतकीय भागीदारी
भारतासाठी परदेशात सर्वाधिक ५०पेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज –
९६ – सचिन तेंडुलकर
८७ -विराट कोहली
८७ – राहुल द्रविड
५९ – रोहित शर्मा
५९ – सौरव गांगुली
उपाहारापर्यंत भारताची एकही विकेट पडली नाही –
या सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संघ १५० धावांवर सर्वबाद झाला आहे. प्रत्युत्तरात भारतीय संघाने खेळाच्या दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत बिनबाद १४६ धावा केल्या. यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल क्रीझवर फलंदाजी करत आहेत. रोहित शर्मा नाबाद ६८ तर यशस्वी नाबाद ६२ धावांवर खेळत आहेत. दोघांमध्ये १४६ धावांची भागीदारी झालीआहे. पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडिया अजूनही वेस्ट इंडिजपेक्षा ४ धावांनी मागे आहे.