भारतीय क्रिकेट संघाचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा आता अलिबागकर झाला आहे. अलिबागजवळ त्याने ४ एकर जागा खरेदी केली आहे. मांडवा बंदरापासून जवळच सारळ इथं ही जागा आहे. या जागेचा व्यवहार ९ कोटी रुपयांना झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज या जागेचे खरेदीखत रजिस्टर करण्यासाठी रोहित शर्मा हा आपली पत्नी रितिका हिच्यासह अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्मा पाठोपाठ ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याही वाटेवर

रोहित शर्मा हा रायगड जिल्ह्यात रजिस्टर इनोव्हा कारमधून आला होता. रोहित शर्मा आल्याचे कळताच त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्मा पाठोपाठ ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या हे देखील लवकरच अलिबागकर होणार आहेत. अलिबाग तालुक्यात ते जागा आणि रो हाऊस खरेदी करणार असल्याचे समजते.

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण झाले अलिबागकर; मापगावमध्ये घेतली ९० गुंठे जागा

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह हे देखील काही दिवसांपूर्वी अलिबागकर झाले आहेत. त्यांनी अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे ९० गुंठे एने जागा खरेदी केली. त्यांनी २२ कोटी रुपयांना ही जमीन खरेदी केली. मुंबईपासून जवळ असलेल्या अलिबागमध्ये दीपिका आणि रणवीरने दोन बंगले खरेदी केले आहेत.

दीपिका आणि रणवीरने खरेदी केलेल्या या जागेत दोन बंगले असून नारळ सुपारीची बाग आहे. दीपिका आणि रणवीर दोघेही १३ सप्टेंबर २०२१ रोजी अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यलयात याची नोंदणी करण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

D-Mart चे मालक राधाकृष्ण दमानी झाले अलिबागकर, पत्नीने खरेदी केला समुद्रकिनाऱ्यावरील आलिशान बंगला

अवस येथे समुद्रकिनाऱ्याला लागून असलेला, ६ एकरांवर पसरलेला एक आलिशान बंगल्याचा नुकताच सौदा झाला. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एका पारशी कुटुंबाने आपली संपत्ती रिटेल किंग आणि शेअर बाजारामधील गुंतवणुकीचे जाणकार असणारे अब्जाधीश राधाकृष्ण दमानी यांची पत्नी श्रीकांतदेवी यांना विकला.

डी-मार्टचे संस्थापक असणारे राधाकृष्ण दमानी यांनी मागील वर्षी दक्षिण मुंबईतील मलबार हिल्समध्ये एक हजार १ कोटींचा बंगला विकत घेतला होता. हे घर देशातील सर्वात महाग बंगला असल्याचं सांगण्यात आलं. राधाकृष्ण यांनी त्यांचे धाकटे बंदू गोपीकिशन दमानींसोबत हा बंगला विकत घेतला. आता दमानी कुटुंबाने अलिबागमध्ये मोठी गुंतवणूक केलीय. राधाकृष्ण दरमानी यांनी २०१५ मध्ये १३८ कोटी रुपयांना रेडिसन ब्लू रिसॉर्ट अॅण्ड स्पा या हॉटेलची मालकी मिळवली होती.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दमानी कुटुंबियांची ही अलिबागमधील दुसरी संपत्ती आहे. यापूर्वी दमानी कुटुंबाने जिराडमध्ये २० एकरांवर पसरलेलं एक मोठं फार्म हाऊसही विकत घेतल्याचं सांगितलं जातं. सध्या खरेदी केलेला आलिशान बंगला हा मांडवा जेट्टीपासून सहा किलोमीटरवर आहे. या बंगल्याच्या आवारामध्ये अनेक फळझाडं असल्याचं सांगण्यात येत आहे. हे घर तब्बल ८० कोटींना विकलं गेलं.

दमानींचा १००१ कोटींचा बंगला

मुंबईमधील मलबार हिल्स येथे दमानी कुटुंबाने विकत घेतलेला बंगला हा नारायण दाभोलकर मार्गावर आहे. या बंगल्याचं नाव ‘मधुकुंज’ असं आहे. हा बंगला दीड एकरांहून अधिक जमीनीवर आहे. बंगल्याचा एकूण बिल्डअप एरिया हा ६१ हजार ९१६ स्वेअर फूट इतका आहे. या बंगल्याच्या खरेदीसाठी दमानी कुटुंबाने ३० कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली होती.

…म्हणून आलिबागला मागणी

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये मुंबईमधील अती श्रीमंतांपैकी १५० कुटुंबे अलिबागमधील आपल्या फार्म हाऊसवर राहत होती. या कुटुंबियांपैकी अनेकजण सोशल नेटवर्किंगवर मोठमोठ्या आकारांच्या बागांमध्ये फिरताना, समुद्र किनाऱ्यावर चालताना आणि स्विमिंग पूलमधील फोटो पोस्ट करत होते. त्यामुळेच आता लॉकडाउननंतर येथे गुंतवणूक करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी समोरुन पुढे येत आहेत.

हेही वाचा : जुही चावला झाली अलिबागकर…विकत घेतलेल्या जागेची किंमत ऐकलीत का?

अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणनेही दोन महिन्यापूर्वी आलिबागमधील मापगावमध्ये २२ कोटींचं घर खरेदी केलं. मुंबई ते मांडवा रो रो सेवा सुरु झाल्याने मांडव्यातील जमीनींचे भावही ५० टक्क्यांनी वाढलेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma buy land in alibag rishabh pant and hardik pandya also going to purchase pbs