भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेमध्ये कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं दमदार कामगिरी करत चाहत्यांची मनं जिंकली. भारतीय संघाची या कसोटी मालिकतली कामगिरी संघाचं मनोधैर्य उंचावणारी ठरल्याचं अनेक क्रीडा विश्लेषकांचं मत आहे. या पार्श्वभूमीवर संघातल्या सर्वच खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कर्णधार रोहित शर्माचं देखील विशेष कौतुक होतंय. नुकतंच रोहित शर्माचं भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरनं कौतुक केलंय. रोहित शर्मा हा हिटमॅन विराट कोहलीपेक्षा चांगला कसोटी कर्णधार बनू शकतो, असं वसीम जाफरनं म्हटलंय.
“रोहित शर्मा विराट कोहलीपेक्षा चांगला कसोटी कर्णधार होऊ शकतो. तो किती कसोटींचा कर्णधार असेल हे मला माहीत नाही, पण रणनीतीने तो सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक वाटतो आणि प्रत्येक मालिका जिंकण्याचा त्याचा माणस असल्याचं दिसून येतं. सध्या भारतीय संघ योग्य कर्णधाराच्या हातात आहे, असे वाटते,” असं वसीम जाफरने भारताने श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर ESPNCricinfoसोबत बोलताना म्हटलंय.
दरम्यान, रोहितची या वर्षाच्या सुरुवातीला कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडलं, त्यानंतर ही जबाबदारी रोहित शर्माला देण्यात आली होती.
भारत-श्रीलंका कसोटी मालिका –
भारताने सोमवारी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात २३८ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली आणि दोन सामन्यांच्या मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळवले. श्रीलंकेविरुद्धच्या दोन विजयांनिशी भारताने मालिकेतून २४ गुण कमावले असले, तरी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत ७७ गुण असतानाही ५८.३३ टक्क्यांमुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे.