एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारी रोहित शर्माने साकारलेल्या संस्मरणीय द्विशतकामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉर्ज बेली प्रभावित झाला होता. सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीमुळे निर्माण होणारे रिक्त स्थान रोहित नक्की भरून काढू शकतो, असे बेलीने म्हटले आहे. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात रोहितने २०९ धावांची घणाघाती खेळी साकारली. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियावर सातव्या एकदिवसीय सामन्यात ५७ धावांनी विजय मिळवला आणि मालिका ३-२ अशा फरकाने जिंकली.
‘‘ती खेळी अलौकिक होती. त्याच्यासाठी ही मालिका अप्रतिम राहिली. सलामीला फलंदाजीला उतरून त्याने चांगल्या खेळी साकारल्या आहेत. सचिनच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये पोकळी निर्माण होणार आहे. सचिनचे ते स्थान रोहित घेऊ शकतो,’’ असे बेलीने सांगितले.
धीम्या गतीने डावाला सुरुवात करून नंतर वेगाने फलंदाजी करणाऱ्या रोहितचे बेलीने मुक्त कंठाने कौतुक केले. ‘‘ती खेळी असामान्य होती. सर्वाधिक षटकारांचा विक्रमही या सामन्यात झाला. रोहितने लाजवाब फलंदाजी केली. त्याने अतिशय सावधपणे शतक साजरे केले. पण त्यानंतर तो गोलंदाजांवर तुटून पडला,’’ असे बेलीने सांगितले.

Story img Loader