IND vs ENG 2nd ODI Updates in Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आली आहे. षटकारासह रोहित शर्माने धावांचा दुष्काळ संपवत झंझावाती शतक झळकावले आहे. रोहित शर्माने अवघ्या ७६ चेंडूत ७ षटकार आणि ९ चौकारांसह १०१ धावा पूर्ण केल्या. रोहित शर्माचे हे वनडे क्रिकेटमधील ३२ वे षटक आहे. तर रोहितचे वनडेमधील दुसरे सर्वात जलद शतक आहे.
रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३३८ दिवसांनी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४७५ दिवसांनंतर शतक झळकावले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय कर्णधार फॉर्मात आला असून ही टीम इंडियासाठी खूप आनंदाची बातमी आहे.
रोहित शर्मा डावाच्या सुरूवातीपासूनच चांगल्या फॉर्मात होता. रोहित शर्माने अवघ्या ३० चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. फिरकीपटू असो वा वेगवान गोलंदाज रोहितने प्रत्येक गोलंदाजाची चांगली शाळा घेत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला.
रोहित शर्माचं दुसरं जलद शतक
रोहित शर्माच्या खराब फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अनेक प्रयत्न करूनही तो रोहित शर्माला सूर गवसेना. पण कटकमध्ये तो वेगळ्याच अंदाजात दिसला. या सामन्यात रोहितने ३ डॉट बॉल्स खेळल्यानंतर चौकारासह आपल्या डावाची सुरुवात केली. पुढच्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकला. त्यानंतर रोहितने काही मागे वळून पाहिलं नाही. त्याने जोरदार फलंदाजी सुरू ठेवत ७५ चेंडूत ६ षटकार आणि ९चौकारांच्या मदतीने ९६ धावा केल्या. यानंतर त्याने २६व्या षटकात आदिल रशीदच्या चेंडूवर षटकार ठोकून आपले शतक पूर्ण केले.
रोहित शर्माने ३२वे वनडे शतक झळकावत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. वनडेमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याच्यापुढे आता विराट कोहली आणि रोहित शर्मा आहेत. यासह वनडे क्रिकेटमध्ये भारताच्या टॉप फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारे फलंदाज
विराट कोहली – ५० शतकं
सचिन तेंडुलकर- ५० शतकं
रोहित शर्मा – ३२ शतकं
रिकी पाँटिंग – ३० शतकं
सनथ जयसूर्या – २८ शतकं