Rohit Sharma Champions Trophy Record : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेत आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. भारत २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. नुकताच फॉर्ममध्ये परतलेला ३७ वर्षीय रोहित चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फलंदाजीमध्ये चमक दाखवण्यास उत्सुक असेल. ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत त्याचा रेकॉर्ड कसा आहे, जाणून घेऊया.
रोहित शर्माचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील रेकॉर्ड –
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहितचा रेकॉर्ड चांगला आहे. त्याने स्पर्धेत आतापर्यंत १० सामने खेळले आहेत आणि ५३.४४ च्या सरासरीने ४८१ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट ८२.५० राहिला आहे. रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. कुमार संगकारा आणि रिकी पॉन्टिंग सारख्या दिग्गजांनीही चार अर्धशतके ठोकली आहेत.
८ वर्षांपूर्वी रोहित शर्माने केला होता मोठा पराक्रम-
चॅम्पियन्स ट्रॉफीचा शेवटचा हंगाम २०१७ मध्ये खेळवण्यात आला होता. रोहितने ८ वर्षांपूर्वी स्पर्धेत खळबळ उडवून दिली होती. तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. त्याने इंग्लंडच्या भूमीवर पाच सामन्यांमध्ये ७६.०० च्या प्रभावी सरासरीने ३०४ धावा केल्या. त्याने बांगलादेशविरुद्ध १२९ चेंडूत १५ चौकार आणि एका षटकारासह १२३ धावांची नाबाद खेळी केली. २०१३ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ‘हिटमॅन’ने पाच सामन्यात १७७ धावा केल्या होत्या.
‘हिटमॅन’ हा विक्रम गाठू शकेल का?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित सध्या १४ व्या स्थानावर आहे. तो या यादीत नंबर वन बनू शकतो पण त्याला २०१७ सारखा चमत्कार करावा लागेल. खरंतर, रोहितला नंबर वन होण्यासाठी ३११ धावांची आवश्यकता आहे. स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज गेलने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये १७ सामन्यांमध्ये ५२.७३ च्या सरासरीने ७९१ धावा केल्या.